घरकुलाच्या नूतनीकरणासाठी पिंजऱ्यांमध्ये रवानगी
मुंबई : भायखळाच्या ‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालया’तील (राणीची बाग) प्राण्यांच्या जुन्या घरकुलाचे अद्ययावतीकरण करण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे या पिंजऱ्यांतील प्राण्यांना इतरत्र हलवण्यात येत आहे. गेल्या आठवडय़ात तीन मगरींना तात्पुरत्या पिंजऱ्यांमध्ये हलवण्यात आल्यानंतर बुधवारी दोन मगरी तसेच १५ माकडांचेही असेच स्थलांतर करण्यात आले. पुढील दोन आठवडय़ांत पाणपक्ष्यांनाही इतरत्र ठेवण्यात येणार आहे.
राणीची बाग तब्बल २ लाख १० हजार ४३७ चौरस मीटर क्षेत्रफळावर असून त्यापैकी ३७ हजार ९०० चौरस मीटर क्षेत्रफळ प्राण्यांच्या पिंजऱ्याने व्यापले आहे. भविष्यात मुंबईकरांना देशी-विदेशी प्राण्यांचे दर्शन घडविण्याची पालिकेची योजना आहे. त्या दृष्टीने येथील पिंजऱ्यांचे नूतनीकरण करण्यात येत आहे. नवीन पिंजरे आधुनिक पद्धतीचे काचेची भिंत असलेले असतील. या कामाकरिता गेल्या आठवडय़ापासून प्राणिसंग्रहालयाचे अधिकारी जुन्या पिंजऱ्यातील प्राण्यांना तात्पुरत्या काळाकरिता बांधलेल्या पिंजऱ्यांमध्ये हलवीत आहेत. प्राणी आणि पक्ष्यांना इतरत्र हलविण्याचे काम जिकिरीचे आहे. पर्यटकांना प्रवेश नसणाऱ्या उद्यानातील एका बाजूला तात्पुरत्या पिंजऱ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. पर्यटकांसाठी बुधवारी संग्रहालय बंद असल्याने त्या दिवशी प्राण्यांना हलविण्याचे काम केले जाते.
आतापर्यंत उद्यानातील पाच मगरी आणि पंधरा माकडांची रवानगी तात्पुरत्या पिंजऱ्यामध्ये करण्यात आली आहे. सध्या उद्यानातील मगरीच्या अधिवासाच्या ठिकाणी सिंहाचा पिंजरा प्रस्तावित आहे. त्यामुळे गेल्या आठवडय़ापासून मगरींचे स्थलांतर करण्याचे काम सुरू आहे. बुधवारी येथील दोन मगरींना तात्पुरत्या पिंजऱ्यांमध्ये हलविण्यात आले. मगरीचे स्थलांतर करण्यासाठी १० फूट लाकडी खोका तयार केल्याची माहिती प्राणिसंग्रहालयाच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कोमल राऊळ यांनी दिली. मगरीचे पोट मजबूत दोरखंडामध्ये अडकवून तिला खोक्यामध्ये खेचण्यात आले. त्यानंतर तिची रवानगी तात्पुरत्या पिंजऱ्यामध्ये करण्यात आली. तसेच पुढील आठवडय़ामध्ये प्राणिसंग्रहालयातील सर्वात मोठय़ा पाणपक्ष्यांच्या संग्रहाला हलविण्यात येणार आहे. त्याकरिता या पक्ष्यांसाठी सध्या तात्पुरता पिंजरा उभारण्याचे काम उद्यानात सुरू आहे, असे राऊळ म्हणाल्या.
२०१९ च्या डिसेंबपर्यंत नवीन पिंजरे उभारण्याचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. जुन्या पिंजऱ्यांच्या जागीच काही नवीन पिंजरे बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे जुन्या पिंजऱ्यांमध्ये असलेल्या प्राण्यांची रवानगी टप्प्याटप्प्याने तात्पुरत्या पिंजऱ्यांमध्ये केली जात आहे.
– डॉ. संजय त्रिपाठी, संचालक, वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय