उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेले यश कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविणारे असून, यामुळे राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसशी सुरू असलेल्या जागावाटपाच्या चर्चेला वेग येईल, असे महाराष्ट्र काँग्रेसच्यावतीने सांगण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस निम्म्या जागांच्या मागणीवर अडून बसल्यामुळे, आघाडीचे जागावाटप बऱ्याच काळापासून रखडले आहे. लोकसभा निवडणुकीत सर्व विरोधी पक्षांचा धुव्वा उडवणारी ‘मोदी लाट’ अवघ्या चार महिन्यांत ओसरू लागल्याचे चित्र मंगळवारी लागलेल्या विविध राज्यांतील विधानसभा पोटनिवडणूक निकालांवरून स्पष्ट झाले. राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर उत्तर प्रदेशमध्ये भाजपची झालेली पिछेहाट आणि राजस्थान, गुजरातमध्ये काँग्रेस पक्षाला मिळालेल्या यशामुळे पक्षातील कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला असल्याची माहिती काँग्रेस प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी दिली.
देशातील जनता मोदी सरकारच्या कारभारावर नाराज असून, विधानसभेला मतदान करताना जनता पुर्नविचार करेल असे वाटत आहे. काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने ही बाब सकारात्मक असून त्यामुळे राष्ट्रवादीबरोबरील जागावाटपाचा तिढाही लवकरच सुटण्यास मदत होईल. तसेच आजचे निकाल असंही सांगतात, की जातीय शक्तींना दूर ठेवण्यासाठी आम्ही एकत्रित रहावे अशी जनतेची इच्छा आहे आणि हाच संदेश आमचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉ़ग्रेसलाही आहे. देशातील जनतेला सांप्रदायिक शक्तींची सत्ता नको असल्याचे उत्तर प्रदेशातील निकालांवरून सिद्ध झाले आहे. तर दुसरीकडे राजस्थानमध्येही तरूणांनी काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर मतदान केल्याचे अनंत गाडगीळ यांनी सांगितले.
सध्या राज्याच्या विधानसभेत काँग्रेस पक्षाकडे असणारे ८२ आमदारांचे संख्याबळ हे भाजप(४६) आणि शिवसेना(४५) यांच्या एकत्रित संख्याबळाच्या आसपास आहे. प्रत्येक पक्षाचा स्वतंत्रदृष्ट्या विचार करायचा झाल्यास, विधानसभेत भाजप आणि शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या जास्त आहे. याशिवाय, २८८ सदस्य संख्या असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत काँग्रेस-राष्ट्रवादीला बहुमतासाठी आणखी एका जागेची गरज आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा