मुंबई : विधान परिषदेच्या पाच आमदारांची विधानसभेवर निवड झाल्याने रिक्त झालेल्या या पाच जागांसाठी २७ मार्चला पोटनिवडणूक होणार आहे. प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र पोटनिवडणूक होणार असल्याने पाचही जागा महायुतीला मिळणार आहेत. भाजपला तीन तर शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा मिळेल.
विधान परिषद सदस्याची लोकसभा अथवा विधानसभेवर निवड झाल्यास त्याचे विधान परिषद सदस्यत्व आपोआपच रद्द होते. प्रवीण दटके, रमेश कराड, गोपीचंद पडाळकर (भाजप), राजेश विटेकर (राष्ट्रवादी अजित पवार), आमश्या पाडवी (शिवसेना शिंदे ) या विधान परिषदेच्या पाच आमदारांची विधानसभेवर निवड झाली. पाचही जणांची आमदारकी संपुष्टात आल्याने पाच जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. १० ते १७ मार्च या काळात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.
प्रत्येक जागा स्वतंत्र
एकापेक्षा अधिक जागांसाठी पोटनिवडणूक होणार असल्यास प्रत्येक जागा ही स्वंतत्र मानली जाते. या विरोधात मागे न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. पण न्यायालयाने याचिका फेटाळली होती. एकापेक्षा अधिक जागांसाठी पोटनिवडणूक असल्यास प्रत्येक जागा ही स्वतंत्र मानली जाते.
कुणाला जागा?
● विधान परिषदेच्या पाच जागांपैकी तीन आमदार भाजपचे आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक आमदार आहे. महायुतीत ज्याची जागा त्याला लढण्याची संधी द्यायची असा निर्णय आधी झाला होता. यानुसार भाजपचे तीन आणि शिवसेना व राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकेल.
● विधानसभेत महायुतीचे २३७ आमदार असल्याने प्रत्यक्ष निवडणूक झाली तरीही महायुतीला पाचही जागा निवडून आणण्यासाठी काहीही अडचण येणार नाही. ● पाचपैकी तीन जागा या पुढील वर्षी मे महिन्यात रिक्त होणार आहेत. उर्वरित दोनपैकी एक जागा २०३० पर्यंत आहे तर दुसरी जागा २०२८ पर्यंत आहे. तिघांना वर्षभरापुरतीच आमदारकी मिळेल.