मुंबईः गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या नावाखाली दोन हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची ११०० कोटी रुपयांची फसवणूक करणारा सनदी लेखापाल (सीए) अंबर दलालविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला असून मुंबईत अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. या कारवाईत डीमॅट, बँक ठेवी अशी ३७ कोटींची मालमत्ता गोठवली असून आरोपीने गुन्ह्यातील ५१ कोटी रुपये स्वतःच्या बँक खात्यात वळते केल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
दलालने फसवणूक केलेल्या व्यक्तींमध्ये देशातील नागरिकांसह अमेरिका, दुबईतील अनिवासी भारतीयांचाही समावेश आहे. तक्रारदारांमध्ये एका प्रसिद्ध अभिनेत्याचाही समावेश आहे. मुंबईच्या ओशिवरा पोलिसांनी १५ मार्च रोजी रिट्झ कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीचे मालक दलाल यांच्याविरुद्ध सुरुवातीला डझनभर गुंतवणूकदारांची ५४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्या आधारावर ईडीने तपासाला सुरुवात केली आहे. आरोपीने गुन्ह्यातील ५१ कोटी रुपये स्वतःच्या बँक खात्यात वळते केले होते. त्याद्वारे भारतात व परदेशात मालमत्ता खरेदी केल्या होत्या. त्यासाठी हवाला नेटवर्कचा वापर करण्यात आल्याचा संशय आहे.
हेही वाचा : ओडीसातून आलेला गांजाचा मोठा साठा जप्त, एनसीबीच्या कारवाईत चौघांना अटक
जुहू येथील फॅशन डिझायनर बबिता मलकानी यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी तक्रारदारांची संख्या वाढली असून आतापर्यंत २००९ तक्रारदार आर्थिक गुन्हे शाखेकडे आले आहेत. आरोपींनी त्यांची एकूण ११०० कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.
हेही वाचा : घर खरेदीदारांसाठी आतापर्यंत फक्त १९५ प्रकल्पात ‘तक्रार निवारण कक्ष’, विकासकांच्या उदासीनतेची दखल
तक्रारीनुसार, एप्रिल २०२३ मध्ये एका मैत्रिणीने मुख्य तक्रारदार मलकानी यांची आरोपी अंबर दलालशी ओळख करून दिली होती. त्याने कामोडीटी ट्रेडिंग करून गुंतवणुकीवर आकर्षक नफा देऊ केला. तसेच प्रत्येक महिन्याला १.५ ते १.८ टक्के परतावा देण्याचे आश्वासन दिले. तक्रारदार महिलेने गुंतवणूक केली आणि तिला वचन दिलेले परतावे मिळाल्यावर तिने आणखी गुंतवणूक केली. एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ आरोपीने अनेकांची फसवणूक केली. दलालला आर्थिक गुन्हे शाखेने देहरादून येथून अटक केली होती. सध्या तो न्यायालयीन कोठाडीत आहे.