मुंबई : ‘सीए’ अंतिम परीक्षेत नवी दिल्लीतील शिवम मिश्रा देशात प्रथम, दिल्लीतील वर्षा अरोरा द्वितीय, तर मुंबईतील किरण मनराल आणि नवी मुंबईतील घिलमान अन्सारी यांनी तृतीय स्थान पटकावले.
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) मे महिन्यात घेण्यात आलेल्या सनदी लेखापाल (सीए) अंतिम आणि इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. सीए अंतिम परीक्षेतील पहिल्या ग्रुपचा निकाल २७.३५ टक्के, दुसऱ्या ग्रुपचा निकाल ३६.३५ टक्के लागला. तर दोन्ही ग्रुप मिळून १९.८८ टक्के निकाल लागला आहे. तर, इंटरमिजिएट परीक्षेतील पहिल्या ग्रुपचा निकाल २७.१५ टक्के, तर दुसऱ्या ग्रुपचा निकाल १८.२८ टक्के आणि दोन्ही ग्रुप मिळून १८.४२ टक्के निकाल लागला आहे.
हेही वाचा >>> मुंबई : प्रशासक नेमण्याच्या कारवाईपासून पेंढारकर महाविद्यालयाला तूर्त दिलासा
‘सीए’ अंतिम परीक्षेतील पहिल्या ग्रुपमधून ७४ हजार ८८७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी २० हजार ४७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दुसऱ्या ग्रुपमधून ५८ हजार ८९१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी २१ हजार ४०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर दोन्ही ग्रुप मिळून ३५ हजार ८९१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी ७ हजार १२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सीए अंतिम परीक्षेत नवी दिल्लीतील शिवम मिश्रा याने ८३.३३ टक्के मिळवत देशात प्रथम येण्याचा मान पटकावला. त्यानंतर दिल्लीतील वर्षा अरोरा ८०.०० टक्के मिळवत द्वितीय स्थानी, तर मुंबईतील किरण मनराल आणि नवी मुंबईतील घिलमान अन्सारी यांनी ७९.५० टक्के मिळवले.
‘सीए’ इंटरमिजिएट परीक्षेत भिवंडी येथील कुशाग्र रॉय याने ८९.६७ टक्के मिळवत देशातून प्रथम तर अकोल्यातील युग करिया आणि भाईंदर येथील यग्य चांडक याने ८७.६७ टक्के मिळवत द्वितीय स्थान आणि तर मुंबईतील हिरेश काशिरामका यांनी ८६.५० टक्के मिळवत तिसरे स्थान पटकावले.
युग कारिया याचे यश
अकोला : सीए इंटरमिजिएट परीक्षेमध्ये अकोल्यातील युग कारिया याने देशातून दुसरे स्थान पटकावले. त्याला ५२६ गुण मिळाले. त्याची टक्केवारी ८७.६७ इतकी आहे.
आर्टिकलशिप सुरू असताना मी अभ्यासासाठीही वेळ द्यायचो आणि उजळणीही सुरू असायची. सकाळी लवकर उठायचो आणि दिवसभराचे नियोजन करायचो. दररोज दोन विषयांचा अभ्यास करायचो. जसजसे वेगवेगळे टप्पे पार केले, त्यानंतर आत्मविश्वास वाढत गेला. – घिलमान अन्सारी, तिसरा क्रमांक
‘सीए’ अंतिम परीक्षेदरम्यान आर्टिकलशिप आणि अभ्यास या दोन्ही गोष्टींचा समतोल राखावा लागतो. आर्टिकलशिप संपल्यानंतर मी उजळणीवर भर दिला. एका विषयाला नेमका किती वेळ द्यायचा, याची योग्य आखणी केली. संपूर्ण देशातून चांगला क्रमांक प्राप्त करणे, हे स्वप्न होते. – किरण मनराल, तिसरा क्रमांक
© The Indian Express (P) Ltd