मुंबईसह उपनगात मेट्रोचे जाळे उभारण्यावर सरकारने भर दिला आहे. त्यामधील मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या वडाळा ते कासारवडवली या मार्गाचा गायमुखपर्यंत विस्तार करण्यास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) बैठकीत मान्यता देण्यात आली होती. आज या विस्ताराला आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे. वडाळा – घाटकोपर – मुलुंड – ठाणे – कासार वडवली मेट्रोच्या या प्रकल्पाला राज्य शासनाने यापूर्वीच मान्यता दिली आहे. मेट्रो-४ अ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या विस्तारित मार्गासाठी ९४९ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.
शहरामध्ये वाढती वाहतूक कोंडी पाहून दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाने तयार केलेला मेट्रो मार्ग ४ अ कासारवडवली – गायमुख (मेट्रो मार्ग ४ चा विस्तार) हा सुधारित प्रकल्प अहवाल एमएमआरडीएने आज सादर केला. या प्रकल्प अहवालाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. मेट्रो मार्ग ‘४ अ’साठी जून २०१७ मध्ये ९४९ कोटी रुपये खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
#मंत्रिमंडळनिर्णय#CabinetDecision
मेट्रो गतिमान : मुंबई मेट्रो
मार्ग 4 अ ला मंजुरी pic.twitter.com/bHZY4gi30F— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 27, 2018
मेट्रो-४ म्हणून ओळखला जाणाऱ्या या मेट्रो रेल्वे मार्गाची लांबी ३२.३ कि.मी. आहे. त्याचा गायमुखपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. हे २.७ कि.मी. अधिकचे अंतर असेल. त्यावर आणखी दोन नवीन स्थानके बांधण्यात येणार आहेत. या मार्गावर २०२१ मध्ये दीड लाख प्रवासी क्षमता असेल आणि २०३१ मध्ये ही क्षमता १३.४४ लाख एवढी असेल. या विस्तारित मार्गासाठी ९४९ कोटी रुपये अतिरिक्त खर्च केला जाणार आहे.