आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेणार
मुंबई : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात आली असून या समितीची पहिली बैठक उद्या शनिवारी होणार आहे.
त्याचबरोबर धनगर समाजाच्या आंदोलनात सहभागींवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
धनगर समाजाच्या मागण्यांसंदर्भात राज्य शासन सकारात्मक असून त्याबाबत निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी काल नवी मुंबईत आंदोलकांना भेटून सांगितले होते. त्यानुसार टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्स(टीस)च्या अहवालाच्या अनुषंगाने धनगर समाजाच्या विविध मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती गठित करण्यात आली आहे.
या उपसमितीमध्ये चंद्रकांत पाटील, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राम शिंदे, महादेव जानकर,पंकजा मुंडे,विष्णू सावरा, राजकुमार बडोले आणि संभाजी पाटील-निलंगेकर यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. धनगर समाजाला विविध सुविधा देण्यासंदर्भात या उपसमितीमध्ये निर्णय होणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
सोलापूर विद्यापीठाला राजमाता अहिल्यादेवी होळकर नाव देण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होत आली असून येत्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब होऊ न निर्णय होणार आहे.