करोना केंद्रे उभारणी, रस्ते-बांधणी, जमीन खरेदी आदी कामांसाठी खर्च करण्यात आलेले सुमारे १२ हजार कोटी रुपये तसेच मुंबई पालिकेच्या ७६ कामांची नियंत्रक व महालेखापरीक्षकांकडून (कॅग) चौकशी करण्यात येणार आहे. याच कारणामुळे आता राज्य सरकार तसेच उद्धव ठाकरे गट पुन्हा एकदा आमनेसामने येण्याची शक्यता आहे. दरम्यान, कॅगकडून होणाऱ्या या चौकशीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महापालिकेत एक वीरप्पन गँग आहे. या गँगने पालिकेला खूप लुटलेले आहे. या सर्व व्यवहाराची चौकशी व्हायला हवी, असे संदीप देशपांडे म्हणाले आहेत. ‘एबीपी माझा’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> “वाईट या गोष्टीचं वाटतय की जो प्रकल्प बाहेर पडतोय तो गुजरातला जातोय; मला वाटतं पंतप्रधानांनी…” ; राज ठाकरेंच विधान!

गैरव्यवहाराच्या संशयावरून पालिकेचे विशेष लेखापरीक्षण करावे अशी विनंती राज्य सरकारने कॅगला केली होती. राज्य सरकारची ही विनंती ‘कॅग’ने मान्य केली असून आता पालिकेच्या कारभाराची चौकशी करण्यात येणार आहे. याविषयी बोलताना “महानरपालिकेत एक वीरप्पन गँग कामाला आहे. वीरप्पाने जंगलामध्ये जेवढं लुटलं त्याहीपेक्षा जास्त लूट त्यांनी मुंबई महापालिकेची केलेली आहे. मला वाटतं कॅगच्या माध्यमातून या लुटीची चौकशी केली जावी. मागे तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मुलाला काम देण्यात आले. डिजेचे तंबू बांधणाऱ्या लोकांना महापालिकेचे कोविड सेंटर उभे करण्याचे काम कसे मिळाले. अनुभव नसताना डॉक्टर पुरवण्याचे काम एका माणसाला देण्यात आले. मला वाटतं या सर्वच बाबींची कॅगकडून चौकशी केली जाईल. महापालिकेच्या बँक अकाऊंट्समध्येही भ्रष्टाचार झालेला आहे. त्याचीही चौकशी व्हायला हवी, असे संदीप देशपांडे म्हणाले आहेत.

हेही वाचा >>> Sharad Pawar Admitted: शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

करोनाकाळात मुंबई पालिकेने शहरात उभारलेल्या करोना केंद्रांत मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपच्या आमदारांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केला होता. त्यावर या आरोपांबाबत चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उभय सभागृहांत केली होती. रस्त्यांची कामे, सफाई कामगारांच्या घरांसाठी असलेल्या आश्रय योजना, भेंडी बाजार पुनर्विकासात रस्त्याची रुंदी कमी करून विकासकाचा झालेला फायदा, मुंबई पालिकेतील काही अधिकारी- कर्मचाऱ्यांनी स्वत:च कंपन्या सुरू करून पालिकेची कामे लाटल्याचा आरोप, या सर्वाची कालबद्ध चौकशी केली जाईल. तसेच काही प्रकरणे फारच गंभीर असल्याने त्यांचे महालेखापरीक्षक व नियंत्रकाकडून (कॅग) विशेष लेखापरीक्षण करण्याचेही फडणवीस यांनी जाहीर केले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cag bmc project mns leader sandeep deshpande criticizes uddhav thackeray group kishori pednekar demand details enquiry prd