मुंबई : बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मार्जारकुळाचे उत्पत्तीस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाघाटीचे (रस्टी स्पॉटेड कॅट) प्रजनन आणि संवर्धन केंद्र उभारण्यात आले असून या संवर्धन केंद्रातील आठही पिंजऱ्यांचे काम पूर्ण झाले आहे. सध्या राष्ट्रीय उद्यानात तीन वाघाटी असून राज्यासह देशात आढळणाऱ्या वाघाटी या केंद्रात आणण्याचे आवाहन राष्ट्रीय उद्यान प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा >>> मुंबई : एक कोटी ३० लाखांचे ३२५ ग्रॅम अमली पदार्थ जप्त
मार्जारकुळातील सर्वात दुर्मीळ आणि सर्वात लहान प्राणी अशी वाघाटीची ओळख आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचरच्या (आययूसीएन) धोकादायक स्थितीत आणि नामशेष होत असलेल्या यादीत वाघाटी नोंद आहे. त्यामुळे वाघाटीची संख्या वाढवण्यासाठी राष्ट्रीय उद्यानाचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रीय उद्यानात २००९-१० पासून वाघाटीचे प्रजनन आणि संवर्धन करण्यास सुरुवात झाली. मात्र, या प्रकल्पाला फारसे यश मिळाले नाही. हे संवर्धन केंद्र वाघांच्या पिंजऱ्याच्या परिसरात असून वाघाच्या वासाने वाघाटीचे प्रजनन होत नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळे नुकतेच उद्यानातील नव्या ठिकाणी संवर्धन केंद्र उभारण्यात आले आहे. हे संवर्धन केंद्रात नैसर्गिक अधिवाससदृश्य स्थिती निर्माण करण्यात आली असून चारही बाजूने जाळीची भिंत तयार करण्यात आली आहे. तसेच, वाघाटीला लपण्यासाठी पोकळ झाडाचे खोडही पिंजऱ्यात ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती राष्ट्रीय उद्यानातील अधिकाऱ्यांनी दिली.
साताऱ्यातील वाघाटी राष्ट्रीय उद्यानात आणणार
राष्ट्रीय उद्यानातील सध्या संवर्धन केंद्रात २०१७ मध्ये पुण्याहून आणलेली पाच वर्षांची नर-मादी जोडी आणि सांगलीमधील शिराळा येथून एक तीन महिन्याचे वाघाटी पिल्लू आहे. तर, साताऱ्यामधील कराड येथे एका उसाच्या शिवारात ऊसतोडी सुरू असताना वाघाटीची दोन पिल्ले आढळली होती. सध्या या पिल्ल्यांची देखभाल आणि संगोपन सातारा वन विभागातर्फे करण्यात येत आहे. मात्र, दोन्ही पिल्ले मोठी झाल्यावर त्यांना राष्ट्रीय उद्यानातील वाघाटी संवर्धन केंद्रात आणण्याची योजना आहे, अशी माहिती राष्ट्रीय उद्यानातील अधिकाऱ्यांनी दिली.