* माहिमच्या मोक्याच्या २९ एकराच्या भूखंडावर केवळ ३८०० सदनिकाच विक्रीसाठी
*  ‘कोहिनूर’साठी म्हाडा अधिकाऱ्यांच्या पायघडय़ा
भ्रष्टाचाराचे कुरण समजल्या जाणाऱ्या ‘म्हाडा’मध्ये आपला प्रस्ताव कसा योग्य आहे हे दाखविण्यासाठी चक्क शासनाचीच दिशाभूल करण्याची संधीही अधिकारी सोडत नसल्याचे माहिम येथील मच्छिमार नगर प्रकरणावरून दिसून येत आहे. या प्रकरणात शासनाकडे बाजू मांडताना ‘म्हाडा’ने आकडेवारीची कमाल दाखवित २९ एकर भूखंडाच्या पुनर्विकासातून सामान्यांसाठी ३०० चौरस फुटाच्या फक्त ३८०० सदनिका मिळण्याबाबत समाधान मानले आहे. माहिम येथील ही मोक्याची वसाहत कोहिनूरला आंदण दिली नसती तर प्रत्यक्षात म्हाडाला यापेक्षा कितीतरी अधिक सदनिका मिळू शकतात, असे म्हाडातीलच अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
हाच प्रकल्प म्हाडाने निविदा मागवून राबविला असता तर सामान्यांच्या सदनिकांमध्ये आणखी शेकडय़ाने भर पडली असती, असे खासगीत मान्य करणारे संबंधित अधिकारी दबावाखालीच आम्ही हा निर्णय घेतल्याचे आता सांगत आहेत.
या पुनर्विकास प्रकल्पातून विकासकाला तब्बल ३० ते ४० लाख चौरस फुट इतके चटईक्षेत्रफळ खुल्या बाजारात विक्रीसाठी मिळणार आहे. या संदर्भातील वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केल्यानंतर तीन आठवडय़ानंतर मुंबई गृहनिर्माण मंडळाचे मुख्य अधिकारी निरंजनकुमार सुधांशु यांनी गृहनिर्माण विभागाचे अवर सचिव संजय इंगळे यांना पत्र पाठवून आपलीच पाठ थोपटून घेतली आहे.  या पत्रातील आकडेवारीवर नजर टाकल्यानंतर पहिल्या टप्प्यात सुमारे पाच एकरच्या भूखंडावर म्हाडाला ३०० चौरस फुटाच्या फक्त ३९६ सदनिका मिळणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात म्हणजे उर्वरित २४ एकर भूखंडावर याच आकडेवारीनुसार म्हाडाला ३३०० घरे मिळणार असल्याचा दावा केला आहे. दुसऱ्या टप्प्यात पोलिसांना ३०० चौरस फूट घरे बांधून देऊन त्यावर मिळणारे ८० टक्के प्रोत्साहनात्मक चटई क्षेत्रफळ तसेच अभिन्यासातील प्रोरेटा चटईक्षेत्रफळ विकासकाच्या घशात जाणार आहे.
मच्छिमार नगर या वसाहतीच्या अभिहस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झालेली नसतानाही तत्कालीन मुख्य अधिकारी भाऊसाहेब दांगडे यांनी म्हाडाच्या इतिहासात पहिल्यांदाच प्राथमिक ‘ना हरकत प्रमाणपत्र’ जारी करण्याचा पराक्रम केला. अभिहस्तांतरण न झालेल्या वसाहती ताब्यात घेण्याची वल्गना करणारे म्हाडा प्रशासन या प्रकरणात मात्र मूग गिळून गप्प आहे.
 म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य अधिकारी सतीश गवई हे प्रत्येक प्रकरणात म्हाडा विकसित करील, अशी घोषणा करतात. परंतु ही मोक्याची वसाहत म्हाडाने ‘कोहिनूर’ला आंदण देऊन टाकल्याचे दिसून येत आहे.
माहिम मच्छिमार नगर
एकूण क्षेत्रफळ – २९ एकर
 ३३ (९) नुसार चटईक्षेत्रफळ – चार
 एकूण वसाहती – अल्प गटाच्या २० इमारती, पोलिसांना भाडय़ाने दिलेल्या १७ इमारती, संक्रमण शिबिराच्या तीन इमारत व एक निमशासकीय इमारत.  एकूण रहिवासी – ३२७२ (अंदाजे)
 पुनर्वसन वजा जाता खुल्या बाजारात विक्रीसाठी क्षेत्रफळ (८० टक्के  प्रोत्साहनात्मक तसेच अभिन्यासावर मिळणाऱ्या प्रोरेटा चटईक्षेत्रफळासह) – किमान ३० ते ४० लाख चौरस फूट (अंदाजे)
 दुसऱ्या टप्प्यातील सुमारे २४ एकर भूखंडावर अद्यापही म्हाडाला ताबा घेता येणे शक्य.
दहिसर येथील चुनाभट्टी वसाहतीच्या तीन एकर भूखंडाच्या पुनर्विकासात म्हाडाला विकासकाने ४८४ चौरस फुटाची सुमारे ५६० घरे देऊ केली आहेत. या प्रकल्पासाठी २.५ इतके चटईक्षेत्रफळ आहे. त्याचवेळी माहिम मच्छिमार वसाहतीत पाच एकरावर म्हाडाला ३०० चौरस फुटाची फक्त ३९६ घरे मिळणार आहेत. या वसाहतीला चार इतके चटईक्षेत्रफळ मिळणार असल्याचे पाहता ही तफावत विकासकाला किती रग्गड फायदा करून देणार आहे, हे सहजी ध्यानात यावे. त्यातही दहिसर आणि माहिम येथील जागांचे भाव लक्षात घेता हा फायदा आणखी कितीपट वाढतो हे सांगण्याची गरज नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा