फेब्रुवारीपासून सीसीटीव्ही बसवण्यास सुरुवात, पश्चिम रेल्वेची माहिती
मुंबई : पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या लोकलमधील मोटरमनच्या केबिनमध्ये येत्या फेब्रुवारीपासून सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून हे काम जून २०२३ मध्ये पूर्ण करण्याचा संकल्प पश्चिम रेल्वेने सोडला आहे. त्यामुळे मोटरमन, गार्डच्या हालचालींवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर रेल्वे मार्गावर घडणाऱ्या दुर्घटना, अपघात, त्यामागील कारणांचा शोध घेता येईल, असे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मोटरमन कॅबिनमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याच्या प्रकल्पाला मंजुरीही दिली असून २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या अर्थंसंकल्पात या प्रकल्पाचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याच्या कामाला वेग आला. मध्य व पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात लोकल गाड्या धावतात. दिवसभरात तीन हजारांहून अधिक लोकल फेऱ्या होतात. लोकल फेऱ्यांच्या नियोजनासाठी रेल्वेकडे स्वतंत्र रेल्वे व्यवस्थापन यंत्रणा आहे. परंतु काही वेळा लोकल चालवणाऱ्या मोटरमनकडून चूका होतात. त्यामुळे अपघाताचा धोका संभवतो. एखाद्या स्थानकातील थांबा विसरणे, वेगमर्यादेचे उल्लंघन करणे, लाल सिग्नल असतानाही गाडी पुढे नेणे अशा घटना अधूनमधून घडत असतात. अशा घटनांचे प्रमाण कमी असले तरी त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. याप्रकरणी दोषी आढळणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांना शिक्षाही करण्यात येते.
अशा घटनांमागील नेमक्या कारणांचा शोध घेता यावा, रेल्वे प्रशासनाकडेही पुरावे उपलब्ध व्हावेत, यंत्रणा हाताळताना मोटरमन व गार्डकडून कोणतीही चूक होऊ नये, एखादी चूक झाल्यास नियंत्रण कक्ष किंवा अन्य यंत्रणांमार्फत त्वरित ती त्यांच्या निदर्शनास आणता यावी, यासाठी खबरदारी म्हणून लोकलमधील मोटरमन आणि गार्ड केबिनच्या आत-बाहेर सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तसेच प्रवासाच्या वेळी रेल्वेच्या हद्दीत घडणाऱ्या घटनाही या सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद होऊ शकतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा >>>> महालक्ष्मी रेसकोर्सवर संकल्पना उद्यान साकारण्याच्या हालचालींना वेग
सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी निविदा प्रक्रियाही राबवण्यात आली असून पुढील महिन्यापासून लोकल मोटरमन-गार्डच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही बसवण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी सांगितले. एका लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये सीसी टीव्ही बसवून त्याची चाचणी करण्यात येईल. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर मोटरमनच्या केबिनमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम जून 2022 पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. पश्चिम रेल्वेच्या ११२ लोकलमधील २२४ मोटरमन-गार्डच्या डब्यांत ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यासाठी दोन कोटी ८० लाख रुपये खर्च प्रस्तावित आहे.
कॅमेऱ्याचा फायदा काय
-लोकलमधील मोटरमनच्या केबिनच्या आत-बाहेर बसविण्यात येणारे सीसी टीव्ही कॅमेरे थेट रेल्वे व्यवस्थापन यंत्रणेशी (टीएमएस) जोडण्यात येणार आहे.
– सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद होणाऱ्या चित्रणावर अधिकाऱ्यांचे बारकाईने लक्ष असेल.
– लोकलवर अज्ञातांकडून होणारी दगडफेक, सिग्नलमध्ये होणारा बिघाड, सिग्नल लाल असतानाही गाडी पुढे घेऊन जाणे, तसेच प्रवाशांचा अपघातही या कॅमेऱ्यात कैद होईल.
– आपत्कालीन समयी मोटरमन व गार्डशी संवाद साधून लोकलचे पुढील नियोजन करणे शक्य होईल.
– मोटरमन व गार्डच्या हालचाली, तसेच अपघात किंवा दुर्घटना कॅमेऱ्यात बंदिस्त होईल. दोघांमधील संवाद रेकॉर्ड करता येणार आहे.