वसरेवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावर बांधण्यात येत असलेल्या मुंबईतील पहिल्या मेट्रो रेल्वेचा पहिला टप्पा सुरू होण्यास आता काही महिन्यांचा अवकाश उरला असून त्यासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. या मेट्रोच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित थेट प्रक्षेपण करणाऱ्या कॅमेऱ्यांद्वारे डब्यातील घडामोडींवर सतत ‘नजर’ ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे दहशतवादी हल्ला, महिलांवरील अत्याचार-छेडछाडीसारख्या घटनांना प्रतिबंध बसून मेट्रोचा प्रवास सुरक्षित होणार आहे. भारतात प्रथमच अशारितीने सार्वजनिक वाहतुकीच्या सेवेत थेट प्रक्षेपण करणारे कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.
वसरेवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावर उभारण्यात येत मेट्रो रेल्वेचा पहिला टप्पा सप्टेंबर २०१३ मध्ये सुरू करण्यासाठीच्या प्रयत्नांना आता गती येत आहे. पहिल्या टप्प्यात वसरेवा ते विमानतळापर्यंत मेट्रो रेल्वे सुरू होणार आहे. मुंबईत आतापर्यंत ‘बेस्ट’च्या बसपासून लोकलपर्यंत सर्व ठिकाणी बॉम्ब ठेवून स्फोट झालेले आहेत. त्याचबरोबर धावत्या लोकलमध्ये बलात्कारासारखा गुन्हाही घडला आहे. तर दिल्लीत मेट्रो रेल्वेत महिलांची छेडछाड आणि त्यांना त्रास देण्याचे प्रकार सतत घडत असतात. या पाश्र्वभूमीवर मुंबईत मेट्रो रेल्वे सुरू होत असताना मेट्रोचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी थेट प्रक्षेपण करणाऱ्या कॅमेऱ्यांची यंत्रणा बसवण्यात येत आहे.
मेट्रोतील डब्यातील प्रत्येक हालचालीवर-घडामोडींवर नजर राहावी यासाठी प्रत्येक डब्यात दोन टोकांना प्रत्येकी एक कॅमेरा बसवण्यात येईल. डब्यातील दोन कॅमेऱ्यांमुळे संपूर्ण डब्यातील घडामोडी टिपता येतील. कॅमेऱ्याने टिपलेली ही दृश्ये चालकाच्या केबिनमधील रेडिओ संचाद्वारे फायबर ऑप्टिक तारांच्या माध्यमातून थेट मेट्रोच्या कारडेपोतील केंद्रीय नियंत्रण कक्षातील पडद्यांवर दिसतील. त्यावर सतत अधिकाऱ्यांची नजर असेल. त्यामुळे एखादी व्यक्ती काही वस्तू ठेवत आहे वा कुणाला काही त्रास देत असेल तर लागलीच ते नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांना दिसेल. अशा काही विपरित घटना घडल्यास, संशयास्पद हालचाली दिसल्यास लागलीच त्यावर उपाययोजना करणे शक्य होईल. थेट प्रक्षेपणाबरोबरच या दृश्यांचे रेकॉर्डिगही होईल. ‘व्हिडीओ ट्रान्समिशन सिस्टिम’ (व्हीटीएस फायरटाइड ७०१०) असे या यंत्रणेचे नाव आहे. हे कॅमेरे ऑस्ट्रियातून आयात करण्यात आले आहेत.
या थेट प्रक्षेपणाच्या यंत्रणेमुळे दहशतवादी, महिलांना त्रास देणारे, पाकीटमार आदींसारख्या समाजकंटकांच्या कारवायांना पायबंद घालण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर आगीसारख्या आकस्मिक आपत्तीची माहितीही तातडीने मिळेल. चुकून अशी दुर्घटना घडलीच तर लागलीच त्यावर नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करता येतील.
डब्यातील दोन कॅमेऱ्यांमुळे संपूर्ण डब्यातील घडामोडी टिपता येतील. कॅमेऱ्याने टिपलेली ही दृश्ये चालकाच्या केबिनमधील रेडिओ संचाद्वारे फायबर ऑप्टिक तारांच्या माध्यमातून थेट मेट्रोच्या कारडेपोतील केंद्रीय नियंत्रण कक्षातील पडद्यांवर दिसतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा