२ ऑक्टोबरच्या डेडलाइनपूर्वी घरातील सामानाची आवराआवर करणाऱ्या कॅम्पाकोलातील रहिवाशांनी मुदतवाढ मिळाल्यानंतर मात्र विचार बदलला असून अखेरपर्यंत घरातच राहण्याचा निश्चय केला आहे. आमच्याकडे दुसरे घर नाही. तेव्हा आमच्यासह घरे पाडा, असे भावनिक आवाहन रहिवाशांनी केले आहे.
वरळी येथील कॅम्पाकोला इमारतींचे अनधिकृत मजले तोडून टाकण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या रहिवाशांना २ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. पालिका कारवाई करणार असल्याने १ ऑक्टोबरला अनेक रहिवाशांनी सामानाची आवराआवर करायलाही सुरुवात केली. मात्र त्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी न्यायालयाने आणखी ४० दिवसांची मुदतवाढ दिली. त्यामुळे रहिवाशांना ११ नोव्हेंबरपर्यंत वेळ मिळाला आहे. मधल्या काळात उच्च न्यायालय, पालिका, राज्य सरकार यांच्याकडे धाव घेतल्यावरही रहिवाशांना कोणतेही आश्वासन मिळालेले नाही. बिल्डरने आमची फसवणूक केली असून आता तो नामानिराळा झाला आहे. दंड भरायलाही आम्ही तयार आहोत. पण या लोकशाहीत आमचे म्हणणे कोणीही ऐकून घेत नाही, अशी तक्रार योगेश मल्होत्रा यांनी केली. घरांसाठी दंड करून ती नियमित करण्याच्या मागणीबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले आहेत. आता मुख्यमंत्रीच याबाबत निर्णय घेऊ शकतील, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. मात्र तूर्त घर सोडून जाण्यास कोणताही रहिवासी तयार नाही.
या भागात झोपडय़ा उभ्या राहण्यासाठी सरकार परवानगी देते. १९९५ पर्यंतच्या झोपडय़ांना सरकार संरक्षण देते. पण त्यापूर्वी बांधलेल्या आमच्या इमारतीबाबत सहानुभूतीपूर्वक विचार केला जात नाही. आजूबाजूला झोपडपट्टी पुनर्विकासाचे टॉवर उभे राहत आहेत आणि कष्टाच्या मिळकतीमधून विकत घेतलेली घरे पाडताना पाहण्याची वेळ आली आहे. घरे तोडल्यास या आवारात राहण्याची वेळ आमच्यावर येईल. त्यामुळे आम्ही अखेरपर्यंत कोठेही जाणार नाही, असे विजय मिरानी यांनी सांगितले. फसवणूक करणाऱ्या बिल्डरला सोडून आम्हाला शिक्षा केली जात आहे. आम्हीही मुंबईचे नागरिक आहोत आणि लोकशाहीत आमच्या बाजूनेही विचार करायला हवा. आम्ही आमच्या घरात राहणार आहोत. दुसरा कोणताही पर्याय आमच्याकडे नाही. आता आमच्यासह घरे पाडा, असे डॉ. मृणालिनी पोतदार म्हणाल्या.
 घरांच्या संदर्भात मिलिंद देवरा, सचिन अहीर, नाना चुडासामा, लता मंगेशकर, आदित्य ठाकरे, प्रिया दत्त, गो. रा. खैरनार यांनी मानवतेच्या दृष्टीकोनातून पाठिंबा दिल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. मात्र गुरुवारी रहिवाशांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत यापैकी कोणीही उपस्थित राहिले नव्हते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा