लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : रस्त्यांची दुरुस्ती, बांधणी, पदपथावरील लादीकरण आदी कामे करताना वृक्ष संवर्धनाकडे दुर्लक्ष होते. वृक्षांच्या बुंध्यालगत डांबरीकरण केले जाते किंवा पेवरब्लॉक बसविण्यात येतात. यामुळे अल्पावधीतच वृक्ष उन्मळून पडतात. अशा वृक्षांचा शोध घेऊन त्यांचे संवर्धन कशा प्रकारे करता येईल यासाठी ‘ग्रीन वर्ल्ड मूव्हमेंट’ने एक नवी मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईकरांनी या मोहिमेत सहभागी होऊन वृक्षसंवर्धनासाठी एक पाऊल पुढे टाकावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

वृक्षारोपण करणे हा एकच पर्याय नसून झाडांची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. मुंबई शहर, तसेच उपनगरांत दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष उन्मळून पडतात. यामुळे केवळ परिसरातील झाडांची संख्या कमी होते असे नाही, तर त्याचा अन्य गोष्टीवरही परिणाम होतो. हा नैसर्गिक ऱ्हास रोखण्यासाठी शहर तसेच उपनगरांत असलेल्या वृक्षांचे योग्य पद्धतीने संवर्धन करण्यासाठी ‘ग्रीन वर्ल्ड मूव्हमेंट’ने एक मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

आणखी वाचा-बदलापूर चकमक प्रकरणी उच्च न्यायालयाचे ताशेरे, ‘सीआयडीला गांभीर्य नाही’

या मोहिमेअंतर्गत परिसरातील सर्वात जुने झाड, धोकादायक अवस्थेतील झाडे, याचबरोबर डांबरीकरण, कॉंक्रीटीकरणाच्या विळख्यात अडकले झाड, ते झाड कुठे आहे याची छायाचित्रसह माहिती ‘ग्रीन वर्ल्ड मूव्हमेंट’च्या ८४५१९१००९९ या क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. ग्रीन वर्ल्ड आणि महानगरपालिका यांच्या समन्वयातून हा उपक्रम राबवला जातो.

‘ग्रीन वर्ल्ड मूव्हमेंट’चा पुढाकार

या मोहिमेअंतर्गत मिळणारी झाडांची माहिती पालिकेला पाठविण्यात येणार असून पालिका त्यावर उपाययोजना करणार आहे. आतापर्यंत आम्हाला चेंबूर, टिळक नगर, वांद्रे कुर्ला संकुल या परिसरातून प्रतिसाद मिळाला आहे. पालिकेनेही मिळालेल्या माहितीच्या आधारे तत्परतेने झाडांवर योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत. -उल्का शुक्ला, संस्थापक, ग्रीन वर्ल्ड मूव्हमेंट