भारतातील ज्या लोकांना गोमांस खाल्ल्याशिवाय राहवत नसेल त्यांनी पाकिस्तानात जावे, असे विधान करून केंद्रीय अल्पसंख्याक  राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी वाद ओढवून घेतला आहे. सरकार अल्पसंख्याकाच्या कल्याणासाठी आणि त्यांच्यात सरकारविषयी विश्वास निर्माण करण्यासाठी काय करत आहे, या प्रश्नाच्या उत्तरादरम्यान नक्वी यांनी हे विधान केले. समाजातील विशिष्ट समुहाला गोमांस खाल्ल्याशिवाय किंवा त्याची विक्री केल्याशिवाय राहवतच नसेल तर हा देश त्यांच्यासाठी नाही. त्यापेक्षा त्यांनी पाकिस्तानमध्ये किंवा अरब देशांमध्ये जावे, असे नक्वी यांच्याकडून सांगण्यात आले. मात्र, अजूनही भारतातील सर्व भागांमध्ये गोमांसावर बंदी नाही. विशेषत गोवा, केरळ आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये गोमांस खाल्ले जाते. तेव्हा त्यांनीही देश सोडायचा का, अशा प्रतिप्रश्न नक्वी यांना करण्यात आला. तेव्हा भविष्यात या देशात गोमांसावर बंदी घालण्यात येईल, त्यामुळे गोमांस खाल्ल्याशिवाय न राहवणाऱ्या लोकांसाठी हा देश नाही, एवढेच माझे म्हणणे असल्याचे नक्वी यांनी सांगितले. एका इंग्रजी वृत्तसंस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या चर्चासत्राला एमआयएमचे नेते असुद्दीन ओवेसी हेदेखील उपस्थित होते. नक्वी यांच्या विधानानंतर ओवेसी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनाही भारताबाहेर जायला सांगणार का, असा सवाल नक्वींसमोर उपस्थित केला. काही दिवसांपूर्वी लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी गोव्याच्या गोमांस सेवन करण्याच्या संस्कृतीचे जाहीर समर्थन केले होते. माझ्या राज्यातील ३८ टक्के जनता अल्पसंख्याक आहे आणि मला त्यांची काळजी घेतलीच पाहिजे, असे पार्सेकर यांनी म्हटले होते.

Story img Loader