लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई: करोनाविषयक निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर रंगकर्मींना दिलासा मिळावा यासाठी मुंबई महानगरपालिकेने आपल्या अखत्यारीतील नाट्यगृहांच्या आरक्षण शुल्कात सवलत जाहीर केली होती. मात्र, करोना संसर्ग नियंत्रणात आल्यानंतर सर्व कारभार हळूहळू पूर्ववत झाला असून या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने नाट्यगृहांसाठी जाहीर केलेली ही सवलत मागे घेतली आणि पूर्वीप्रमाणे आरक्षण शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. हे आरक्षण शुल्क १ एप्रिलपासून आकारण्यात येत आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या बोरिवलीतील प्रबोधनकार ठाकरे, विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृह, मुलुंडमधील कालिदास नाट्यगृह आणि भायखाळ्यातील अण्णाभाऊ साठे नाट्यगृहांना प्रतिसत्र आरक्षण शुल्क लागू करण्यात आले आहे. १ एप्रिलपासून लागू झालेल्या या नियमावलीअंतर्गत सर्वसाधारण शुल्क आणि मराठी भाषेतील कार्यक्रमांसाठी सवलतीचे शुल्क असे दोन भागांत वर्गीकरण करण्यात आले आहे. या नव्या शुल्क सूचीनुसार सर्वसाधारण कार्यक्रमांसाठी सोमवार ते शुक्रवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी २६ हजार रुपये ते ३० हजार रुपये शुल्क आकारण्यात येत आहेत. तर मराठी भाषिक कार्यक्रमांसाठी सवलतीचे शुल्क लागू करण्यात आले असून हे शुल्क १२ हजार रुपये ते १५ हजार रुपयांदरम्यान आहे.

आणखी वाचा- मुंबई: चार महिन्यांपासून जलबोगद्यातून गळती

करोनाकाळात विशेष सवलतीत मराठी नाटकांसाठी प्रत्येक प्रयोगामागे पाच हजार रुपये, तर इतर भाषिक नाटकांसाठी १० हजार रुपये आरक्षण शुल्क आकारण्यात येत होते. या काळात ठप्प झालेल्या नाट्यभूमीला उभारी देण्यासाठी ही शुल्क सवलत देण्यात येत होती. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेला सुमारे साडेतीन ते चार कोटी रुपये तोटा सोसावा लागल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

दरवर्षी १ एप्रिल रोजी नाट्यगृहांच्या आरक्षण शुल्कात ५ टक्क्यांनी वाढ करण्यात येत होती. मात्र करोनाकाळात कोणतीही शुल्कवाढ करण्यात आलेली नाही. १ एप्रिल २०२३ रोजी लागू झालेले शुल्क २०२१ प्रमाणे, तर २०२४ आणि २०२५ मध्ये लागू होणारे शुल्क हे २०२२ प्रमाणे असेल. नाट्यगृहांच्या आरक्षण शुल्कात १ एप्रिल २०२६ पासून नियमित वाढ करण्यात येईल, असे नाट्यगृह समन्वयक संदीप वैशंपायन यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cancellation of concession on reservation fee of theatres of mumbai municipal corporation mumbai print news mrj