बनावट संस्थेतर्फे मदत मागितल्याने कोठडी
‘तुमचे दहा रुपये एका लहानग्याचा जीव वाचवू शकतात,’ असे भावनिक आवाहन करून उपनगरीय रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांच्या काळजाला आणि त्यामार्फत खिशात हात घालणाऱ्यांविरोधात रेल्वे सुरक्षा दलाने पुन्हा एकदा मोहीम सुरू केली आहे. रेल्वे प्रवासात कर्करोगग्रस्त लहान मुलांच्या उपचारासाठी बनावट संस्थांच्या नावे पैसे गोळा करणाऱ्या तरुणांविरोधात दंडात्मक कारवाई केली जात आहे. अशा मोहिमेत पहिल्यांदाच एका २१ वर्षीय तरुणीला तीन दिवसांची कोठडी देण्यात आली.
लांब पल्ल्याच्या तसेच उपनगरीय गाडय़ांमध्ये हातात भलीमोठी फाइल घेऊन हिंडणारे हे तरुण कर्करोगग्रस्त लहानग्या मुलांच्या उपचारासाठी पैसे मागतात. या फाइलमध्ये त्या रुग्णाची छायाचित्रे, त्याचा इतर तपशील आदी बाबींचा समावेश असतो. बऱ्याचदा ही मुले ज्या संस्थांसाठी पैसे गोळा करतात, त्या संस्था अस्तित्वातच नसल्याचे आढळले आहे. विशेष म्हणजे लहानग्या मुलांची छायाचित्रे पाहून प्रवासीही अगदी १०-२० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंतच्या नोटा या तरुणांकडे असलेल्या दानपेटीत टाकतात. रेल्वेच्या हद्दीत अशा प्रकारे पैसे गोळा करणे हे दंडनीय आहे. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अशा तरुणांविरोधात मोहीम सुरू करत १९ जणांवर कारवाई केली होती. आता मार्च महिन्यातही रेल्वे सुरक्षा दलाने पुन्हा १५ दिवसांसाठी मोहीम राबवली. त्यात आठ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी २१ वर्षीय तरुणीला तीन दिवसांची कोठडी ठोठावण्यात आली. ही तरुणी बनावट संस्थेसाठी पैसे गोळा करताना दोन वेळा पकडली गेली. पहिल्या वेळी दंड भरून सुटल्यानंतरही तिने हे प्रकार चालू ठेवल्याने दुसऱ्यांदा पकडल्यावर तिला कोठडी दिल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय रेल्वे सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांनी दिली.