लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर दुसरा दिवस सर्व उमेदवारांनी प्रचाराचा शीण घालवला आणि मतटक्क्याची आकडेवारी अभ्यासण्यात घालवला. कोणत्या परिसरात किती मतदार मतदानासाठी उतरले, तर कोणत्या परिसरातील मतदार कमी आले यावरून उमेदवाराला किती मते मिळतील याचा अंदाज बांधण्याच्या कामाला कार्यकर्ते लागले होते. तर अनेक उमेदवारांनी आता मतमोजणीसाठी कार्यकर्ते तयार करण्यास सुरूवात केली आहे.
विधानसभा निवडणकीसाठी बुधवारी मतदान पार पाडल्यानंतर आता सगळ्यांचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे. येत्या शनिवारी मतमोजणी होणार आहे. मात्र तोपर्यंत गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस आहेत. गेल्या किमान १५ दिवसांपासून प्रचाराला सुरूवात झाली होती. तेव्हापासून १५ दिवस मतदारसंघ पिंजून काढण्यासाठी उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी कंबर कसली होती.
आणखी वाचा-मुंबई : उपनगरातील किमान तापमान १९ अंशाखाली
घरोघरी भेटीगाठी, पदयात्रा, प्रचार रॅली, चौकसभा, समाज माध्यमांवरचा प्रचार हे सारे थांबल्यानंतर प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदानासाठी आणणे, मतदान वाढवण्यासाठी प्रयत्न करणे ही सगळी लगबग आता थांबली. गुरुवारी बहुतांशी कार्यकर्ते आणि उमेदवार यांनी कित्येक दिवसांनंतर आराम केला. मात्र त्यानंतर मतदान कुठे किती झाले कोणत्या सोसायटीतून, वसाहतीतून मतदान झाले याचा ठिकठिकाणी उमेदवार आणि कार्यकर्ते अभ्यास करीत होते.
आणखी वाचा-मुंबईत मतटक्का वाढला, अणुशक्ती नगर आणि चांदिवलीचा अपवाद
निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियमानुसार आज उमेदवारांसोबत बैठक घेऊन मतटक्क्याची आकडेवारी अंतिम केली. तसेच मतमोजणीसाठी कोणत्या विभागात किती टेबल, त्यावर किती कर्मचारी, उमेदवारांचे किती प्रतिनिधी याबाबतही अनेकांनी नियोजन केले. त्यानुसार कार्यकर्त्यांच्या नेमणूका करणे याबाबांमध्ये आजचा दिवस कार्यकर्त्यांनी घालवला.