मुंबई : पोलीस भरतीसाठी राज्यभरातून हजारो उमेदवार मुंबईत दाखल झाले आहेत. सांताक्रूझ येथील मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील मैदानावर पोलीस भरतीसाठी गुरुवारी मैदानी चाचणी घेण्यात येत आहे. मात्र, भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना सुरक्षेचे कारण पुढे करीत मुंबई विद्यापीठ प्रशासनाने संकुलाच्या आवारात वास्तव्यास मनाई केली. परिणामी, या उमेदवारांना बुधवारची रात्र रस्त्यावरच काढवी लागली. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर, पदपथावर, तसेच पुलाखाली शेकडो उमेदवार रात्री मुक्कामी होते.
सत्ताधाऱ्यांनी वांद्रे-कुर्ला संकुलात आयोजित केलेल्या राजकीय सभांच्या वेळी मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली होती; परंतु पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना आसरा दिला जात नाही. या परिसरात मोठय़ा प्रमाणात गाडय़ांची वर्दळ असते. यामुळे रात्री अपघात झाल्यास त्यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित करीत सर्वच स्तरांतून मुंबई विद्यापीठ प्रशासन व महाराष्ट्र शासनाच्या विरोधात रोष व्यक्त करण्यात येत आहे.
‘४-५ दिवसांपूर्वीच पोलीस भरतीसाठी आम्ही मुंबईत आलो आहोत; परंतु मुंबई विद्यापीठाने अद्यापही आमची कलिना संकुलातील मैदानात राहण्याची व्यवस्था केलेली नाही. परिणामी, सर्व उमेदवार रात्री पदपथावरच झोपत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिसरात डासांचा प्रादुर्भाव असून त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पिण्याचे पाणी तसेच शौचालयाची सुविधाही उपलब्ध करण्यात आलेली नाही’, असे महाड येथून आलेल्या एका उमेदवाराने सांगितले.
विद्यार्थ्यांसाठी सुविधा
मुंबईत पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांच्या वास्तव्याची व्यवस्था कलिना येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर करण्यात आली आहे. उमेदवारांच्या सोयीसाठी कलिना येथील मुंबई विद्यापीठाच्या संकुलापासून पोलीस मुख्यालयाच्या मैदानापर्यंत मार्ग दर्शविणारे फलकही लावण्यात आले आहेत. परंतु भरतीदरम्यान प्रथम प्रवेश मिळावा आणि गर्दी टाळण्यासाठी अनेक उमेदवार रात्रीच मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलाच्या प्रवेशद्वारासमोर येऊन थांबतात, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.
अटी व शर्तीवर परवानगी
मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील उत्तरद्वार ते महात्मा फुले भवनपर्यंतच्या रस्त्यालगत असलेली मोकळी जागा २० जानेवारी ते ३० मे २०२३ दरम्यान अटी व शर्तीने पोलीस भरतीसाठी वापरण्यास पोलीस उपायुक्त सशस्त्र पोलीस प्रशिक्षण क्रीडा व कल्याण कार्यालय, मुंबई आणि मुंबई विद्यापीठ यांच्यात करार झाला आहे, असे मुंबई विद्यापीठ प्रशासनाचे म्हणणे आहे.
सुविधांचा अभाव
विद्यार्थ्यांना संकुलात जागा द्यावी यासाठी आंबेडकर स्टुडंट असोसिएशनने विद्यापीठाशी संपर्क साधला होता. मात्र विद्यापीठाने उलटपक्षी सुरक्षेचे कारण पुढे करीत उमेदवारांना संकुलाच्या आवारात घेण्यास नकार दिला. हा प्रकार केवळ मुंबई विद्यापीठातच नाही, तर पोलीस भरतीच्या सर्वच केंद्रांत घडत आहे. शासनाने उमेदवारांसाठी निवारा, भोजन, सुविधा उपलब्ध करायला हव्यात, असे प्रवक्ते आनंदराज घाडगे म्हणाले.