लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
मुंबई: विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातही तळमळीने काम करणाऱ्यांपेक्षा श्रीमंत आणि फसवणुकीपासून भ्रष्टाचारापर्यंत गुन्हे दाखल असलेले उमेदवार रिंगणात आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढविणारे भाजपचे विद्यामान आमदार निरंजन डावखरे यांची ५५ कोटींची मालमत्ता असल्याची माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिली आहे. मुंबई पदवीधरमधील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांची ३२ कोटींची मालमत्ता आहे.
डावखरे यांच्यावर करोना काळात टाळेबंदीचे उल्लंघन करून करोना रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी आंदोलन केल्याबद्दल दोन गुन्हे दाखल आहेत. डावखरे यांच्याकडे ९५५ ग्रँम सोने, ५.८ किलो चांदी, गाडी, विविध वित्तीय संस्थामधील गुंतवणूक अशी १७ कोटी ६८ लाखांची जंगम मालमत्ता आहे. तसेच शिरुर, हवेली (पुणे) येथे शेतजमीन, महाबळेश्वर येथे बंगला, येऊर येथे जमीन मुंबई, ठाण्यात व्यावसायिक आणि निवासी जागा अशी ३८ कोटींची स्थावर मालमत्ता आहे. तर विविध वित्तीय संस्थांचे ९ कोटींचे दायित्वही आहे.
हेही वाचा >>>मुंबईसह ठाण्यात पावसाची शक्यता
अनिल परब यांच्यावर राजकीय आंदोलन, ध्वनी प्रदूषण, सरकारी कामात अडथळा, दंगल यासोबतच दापोलीतील रिसॉर्ट प्रकरणात अनाधिकृत बांधकाम, फसवणूक, भ्रष्टाचार, एमआरटीपी असे विविध पोलीस ठाण्यात २४ गुन्हे दाखल असून प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. परब आणि त्यांच्या कुटुंबियांची जंगम मालमत्ता १९ कोटींची तर स्थावर मालमत्ता १३ कोटींची असून ४ कोटी ८६ लाखांचे वित्तीय संस्थांचे दायित्व आहे. परब यांच्याकडे सुमारे २२१५ ग्रँम (१९० तोळे) सोने. चांदीचे दागिने, वित्तीय संस्थांमधील गुंतवणूक, मुंबईत व्यापारी गाळे, फ्लॅट तसेच कर्जतला शेत जमीन आहे. तर दीपक सावंत यांची जंगम मालमत्ता ८ कोटी ४९ लाख त्यांच्याकडे १०५ तोळे सोने-चांदीचे दागिने आहेत. सावंत यांच्या १६ कोटींची स्थावर मालमत्ता असून सुमारे ६० लाखाचे दायित्व आहे. शिवसेनेचे संजय मोरे पदवीधर असून त्यांच्यावरही राजकीय आंदोलनाचे तीन गु्न्हे दाखल आहेत.