अभिनेते नाना पाटेकर यांचे आवाहन
सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी सोमवारी दुपारी ‘लोकसत्ता’च्या नरिमन पॉइंट येथील कार्यालयास भेट देऊन संपादकीय विभागाशी दिलखुलास गप्पा मारल्या.
आजकाल विचारांची कक्षाच संकुचित होत चालली आहे. दिल्लीतील पाशवी सामूहिक बलात्काराला बळी पडली ती माझी मुलगी नव्हती ना, इथपर्यंत आपले विचार खुजे होत गेले आहेत, त्यामुळेच, एखादी मेणबत्ती लावण्यापुरतेच आपण मर्यादित झालो आहोत. पण, हे बदलले पाहिजे. या मेणबत्त्यांची मशाल झाली पाहिजे, आणि मशालीच्या तलवारी झाल्या पाहिजेत.. ती वेळ आली आहे, असे सडेतोड मत मांडत, अभिनेता नाना पाटेकर यांनी सोमवारी थंड सामाजिक मानसिकतेबद्दल चीड व्यक्त केली. नाटक-सिनेमातली मुशाफिरी असो किंवा राजकारण्यांपासून कलाकारांपर्यंत कोणावरही केलेली टीकाटिप्पणी असो.. सडेतोड आणि थेट व्यक्तिमत्त्व म्हणूनच नाना पाटेकर प्रसिध्द आहेत. सोमवारी ‘लोकसत्ता’ कार्यालयात संपादकीय विभागाशी रंगलेल्या गप्पांमधून त्यांच्या याच स्वभावाचे प्रत्यंतर आले.
मराठी नाटक-सिनेमा आणि बॉलिवूडपासून, दिल्लीतील त्या अमानुष बलात्कार प्रकरणापर्यंत विविध विषयांवर बोलताना नाना पाटेकर या अभिनेत्याच्या मनातील सामाजिक जाणीवा जागा असलेला माणूस सतत समोर येत राहिला. जे.जे. कला महाविद्यालयातून शिक्षण घेतलेला, परिस्थितीशी प्रखर झुंज घेत यशाची कमान चढलेला आणि त्यामुळेच सदैव मन जागे ठेवणारा मनस्वी कलाकार, बाबा आमटेंच्या सहवासात सेवा आणि श्रमाचे मोल शिकलेला कार्यकर्ता, आणि नाटक-सिनेमामधून प्रेक्षकांना भेटणारा अभिनेता यामधील ‘खऱ्या नाना’चा पारदर्शकपणे प्रामाणिक शोध घेणारा हा मनस्वी नानादेखील आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनुभवास आला. मी एकेठिकाणी फार काळ रूजलो, तर, खरा नाना कोणता हा प्रश्न माझा मलाच पडेल, अशा सहज उत्तरातून नानाने त्याची कबुलीही दिली. संचय किती करायचा हे कोणी ठरवलेले नसते, त्यामुळेच भूक आणि हाव वाढत चालली आहे, हे सांगताना, राजकारण्यांनी किती भ्रष्टाचार करायचा हे ठरवलेले नसते, म्हणूनच ते एकामागून एक घोटाळे करत राहतात, कारण, त्यांना आपली भूक किती आहे हेच माहिती नसते, अशी उपहासात्मक टीकाही नानाने केली. आपल्याला सहजपणे चांगल्या गोष्टी मिळत गेल्या आणि त्यातूनच आपले व्यक्तिमत्त्व घडत गेले. योग्यवेळी विजयाबाई भेटल्या. त्यांच्यामुळे आज मी जो अभिनेता आहे तसा घडलो, अन्यथा काही वेगळाच कलाकार झालो असतो, असे नानाने सांगितले. राजकारण्यांवर केलेल्या टीकेमुळे अनेकदा चर्चेच्या झोतात आलेल्या नानाने राजकीय नेत्यांशी असलेल्या मैत्रीचे धागेही अलगदपणे उलगडून दाखविले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सहवसातील अनेक आठवणींतही नाना काही क्षण रमला आणि हळवाही झाला.. मी शिवसेनेचा पुरस्कर्ता नाही, पण मला व्यक्तिश बाळासाहेब आवडायचे असेही त्याने स्पष्ट केले. एक कलावंत म्हणून जे जे चांगले आहे ते मला घ्यायचे आहे. एखाद्याच्या स्वभावातील अमुक एक वाईट आहे, असा विचार करून कुणाला नाकारता येणार नाही, असे सांगत, राजकारण्यांच्या भल्याबुऱ्या प्रतिमेविषयी आपल्याला देणेघेणे नाही, असेही नानाने ठासून सांगितले.
राजाभाऊ परांजपेंचे मराठी चित्रपट, विजयाबाईंच्या तालमीत मिळालेले अभिनयाचे धडे, सिनेमाच्या पडद्यावर मिळालेला नावलौकिक अशा अनेक विषयांवर मन मोकळे करताना, गेली चाळीस वर्षे अभिनयाच्या क्षेत्रात पाय घट्ट रोवून स्वतचा ठसा उमटविणारा हा कलावंत स्वतमधील सामान्य माणसाची प्रतिमाही अभिमानाने जपतो, याचीही प्रचीती देऊन गेला.
* संचय किती करायचा हे कोणी ठरवलेले नसते, त्यामुळेच भूक आणि हाव वाढत चालली आहे. राजकारण्यांनी किती भ्रष्टाचार करायचा हे ठरवलेले नसते, म्हणूनच ते एकामागून एक घोटाळे करत राहतात. कारण त्यांना आपली भूक किती आहे हेच माहिती नसते.
– नाना पाटेकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा