दिल्लीतील सामुहिक बलात्काराच्या घटनेचे तीव्र पडसाद भारताच्या राजधानीसह ‘फेसबुक’ आणि ‘ट्विटर’सारख्या सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांवरह उमटू लागले आहेत. दिल्लीतील घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त करणाऱ्या या प्रतिक्रियांमधून बलात्काऱ्याला फाशीेची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
बलात्काऱ्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणारे अनेकजण फेसबुकवरील गटांच्या (कम्युनिटी) माध्यमातून एकवटले आहेत. तर मान्यवरांसह सामान्यांच्या प्रतिक्रिया ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागल्या आहेत. ‘दिल्ली रेप-गीव्ह डेथ टू रेपिस्ट’, ‘कॅपिटल पनिशमेंट टू रेपिस्ट’ आदी नावांनी सातहून अधिक गट फेसबुकवर तयार झाले आहेत. त्यांना हजारो तरूणतरूणी आपला पाठिंबा दर्शवित आहेत.
दिल्लीतील सामुहिक बलात्काराच्या घटनेची चर्चा या गटांच्या माध्यमातून होताना दिसून येते आहे. राग, संताप, निराशा अशा अनेक भावनांनी भरलेल्या या प्रतिक्रियांमधून दिल्लीत सुरू असलेल्या निदर्शनांचीही दखल घेण्यात आली आहे. त्याचबरोबर एकटय़ादुकटय़ा मुलींनी स्वसंरक्षण कसे करायचे याचे सचित्र धडेही या चर्चेमध्ये दिलेले दिसून येतात. काही जण दिल्लीतील पिडीत मुलीची आस्थेने चौकशी करीत आहेत. तर काही जण बलात्काऱ्याला फाशीचीच शिक्षा कशी योग्य आहे, याचे वेगवेगळ्या प्रकारे समर्थन करणाऱ्या भूमिका मांडत आहेत.    

‘इनफ इज इनफ’
दिल्लीतील सामुहिक बलात्काराच्या घटनेची दखल घेत माटुंग्याच्या ‘वीर जिजामाता तंत्रशिक्षणसंस्थे’च्या (व्हीजेटीआय) विद्यार्थ्यांनी कांदिवलीच्या ग्रोवेल मॉलमध्ये ‘इनफ इज इनफ’ नावाचे रुबिक्स क्यूब आर्ट तयार केले आहे. ६ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या संस्थेच्या ‘टेक्नोव्हॅन्झा’ या तंत्र महोत्सवाच्या निमित्ताने तयार केलेल्या या चित्रात महिलांवरील अत्याचाराला वाचा फोडण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला आहे. या चित्रासाठी तब्बल अठराशे क्युब्ज वापरण्यात आल्या आहेत.

Story img Loader