मुदतबाह्य होण्याच्या भीतीने ४५ वर्षांवरील सर्वाना वर्धक मात्रा देण्याचा आग्रह

शैलजा तिवले

मुंबई : नफा मिळविण्याच्या उद्देश्याने लशींची साठेबाजी केलेल्या खासगी रुग्णालयांमध्ये आता लसीकरणासाठी फारसे कुणी फिरकत नाही. त्याच वेळी सुमारे ७० ते ८० हजार लशींची येत्या महिनाभरात मुदत संपुष्टात येणार आहे. त्यामुळे या लशी वाया जाण्याची शक्यता आहे. आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी वर्धक मात्रा सुरू करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी या रुग्णालयांकडून होऊ लागली आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाने लशीचे विकेंद्रीकरण करण्याचे लसधोरण १ मे २०२१ मध्ये स्वीकारत उत्पादनापैकी सुमारे ७५ टक्के साठा खुल्या बाजारात विक्रीसाठी परवानगी दिली. याचा फायदा घेत मुंबईतील खासगी आरोग्य कंपन्या आणि रुग्णालयांनी मोठय़ा प्रमाणात लशींची खरेदी करून साठेबाजी केली. सरकारने २१ जून २०२१ पासून धोरणात पुन्हा बदल केला आणि मोफत लसीकरण करण्यास सुरुवात केली. खासगी रुग्णालयांमधील लसीकरणाचे प्रमाण वेगाने घटले. त्यामुळेच लशीचा खरेदी केलेला बराचसा साठा पडून राहिला आहे.

‘मुंबईतील खासगी रुग्णालयांमध्ये ७० ते ८० हजार लशींचा साठा असून येत्या महिनाभरात याची मुदत संपुष्टात येणार आहे. त्यामुळे हा साठा वाया जाऊ नये यासाठी याचा पुरेपूर वापर कसा केला जाईल, याचे प्रयत्न सुरू आहे,’ खासगी रुग्णालयांचे समन्वयक व बॉम्बे रुग्णालयातील फिजिशयन डॉ. गौतम भन्साली यांनी सांगितले. खासगी रुग्णालयांमधील या साठय़ाचा वापर सरकारी केंद्रावर करण्याची मागणी खासगी रुग्णालये करीत आहेत. परंतु केंद्रामार्फत मोफत साठा प्राप्त होत असताना आम्ही हा साठा का खरेदी करावा, अशी भूमिका राज्याच्या आरोग्य विभागाने घेतली आहे.

‘खासगी रुग्णालयांनी खरेदी केलेला लशींची साठवणूक योग्यरितीने केली आहे का इथपासून अनेक प्रश्न आहेत. मोफत लस मिळत असताना राज्य सरकार कोणताही साठा खरेदी करणार नाही,’ असे आरोग्य विभागाचे अपर सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी स्पष्ट केले. ‘मुदतबाह्य होत आलेला खासगी रुग्णालयांतील उपलब्ध लससाठा पालिकेच्या केंद्रावर मोफत उपलब्ध करावा किंवा सामाजिक उत्तरदायित्त्वाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावा, असे पर्याय त्यांना दिलेले आहेत. हा साठा पालिका खरेदी करणार नाही. त्यांनी या पद्धतीने उपलब्ध करून दिल्यास वापर केला जाईल,’ असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

४० टक्के साठा मुंबईत

राज्यात मे २०२१ मध्ये खासगी रुग्णालयांनी खरेदी केलेल्या ३२ लाख ३८ हजार लशींच्या साठय़ांपैकी सुमारे ४० टक्के साठा मुंबईतील खासगी रुग्णालयांनी खरेदी केला होता. खासगी रुग्णालयांमध्ये १ मेपासून लसीकरण सुरू झाल्यानंतर ऑगस्ट २०२१ पर्यंत राज्यात ८७ लाख ३६ हजार ११९ जणांचे लसीकरण या रुग्णालयांमध्ये केले होते. मुंबईत सर्वाधिक ३३ लाख ८१ हजार जणांचे लसीकरण केले होते.

खासगी रुग्णालयांना अनुदान देऊ नये

खासगी रुग्णालयांना लस साठा खरेदी करायला परवानगी देणे ही केंद्राची सर्वात मोठी चूक होती. या रुग्णालयांनी या लशींमध्ये मोठय़ा प्रमाणात नफा कमाविला आहे, त्यामुळे आता या लशी केंद्राने थेट ताब्यात घ्याव्यात यावर कोणतीही सबसिडी किंवा अन्य आर्थिक फायदा रुग्णालयांना होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे मत सार्वजनिक आरोग्य अभ्यासक रवी दुग्गल यांनी व्यक्त केले.

मात्रा वाया न जाऊ देण्याची जबाबदारी केंद्राची

 केंद्राच्या चुकीच्या लसधोरणामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. त्यामुळे यातील एक ही मात्रा वाया गेल्यास ही पूर्णत: केंद्राची जबाबदारी असेल. आफ्रिकासारखे अनेक देश भारतातून पुरविल्या जाणाऱ्या लशींच्या साठय़ावर अवलंबून आहेत. या परिस्थितीमध्ये लशींच्या मात्रा मुदत संपण्याअगोदर वापरल्या न गेल्यामुळे वाया जाऊ न देणे यासाठी केंद्राने तातडीने प्रयत्न करायले हवेत, असे मत सार्वजनिक आरोग्य विषयातील तज्ज्ञ डॉ. सुभाष साळुंखे यांनी व्यक्त केले.

Story img Loader