मुंबई : येत्या दोन-वर्षांत मध्य आणि पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गांवर टप्प्याटप्प्याने २३८ वातानुकूलित लोकल दाखल होणार आहेत. या लोकलची देखभाल आणि दुरुस्तीसाठी बोईसरमधील वाणगाव आणि कर्जतजवळील भिवपुरी येथे कारशेड उभारण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) दिली. कारशेडसाठी संयुक्त मोजमाप सर्वेक्षणही पूर्ण झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एमआरव्हीसीच्या एमयूटीपी 3 अंतर्गत ४७ आणि एमयूटीपी 3 एअंतर्गत १९१ वातानुकूलित लोकल मुंबई उपनगरीय मार्गावर दाखल होणार आहेत. यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मेट्रोच्या धर्तीवरील या लोकल आकर्षक आणि सुविधांनी सज्ज असतील. अशा लोकलची देखभाल आणि दुरुस्तीसाठी स्वतंत्र यंत्रणेची आवश्यकता आहे. सध्या मध्य रेल्वेवर कुर्ला, कळवा आणि सानपाडा येथे, तर पश्चिम रेल्वेवर महालक्ष्मी आणि विरार येथे कारशेड आहेत. येथे सामान्य लोकल, तसेच सध्याच्या वातानुकूलित लोकलची देखभाल-दुरुस्ती होते. परंतु रेल्वेच्या ताफ्यात मोठया प्रमाणात लोकल दाखल झाल्यास या कारशेडमधील सुविधा अपुरी पडण्याची शक्यता आहे. नवीन वातानुकूलित लोकलच्या देखभालीसाठी वेगळी यंत्रणा उभारावी लागणार आहे. त्यासाठी कारशेडच्या जागेचा शोध घेण्यात येत होता.

महापे येथील जागेची पाहणी करण्यात आली होती. मात्र ती योग्य नसल्याचे कारण पुढे करून नाकारण्यात आली. बोईसर येथील वाणगाव आणि कर्जत जवळीक भिवपुरी येथे कारशेडसाठी जागा निश्चित करण्यात आली असून त्याचे संयुक्त मोजमाप सर्वेक्षण पूर्ण झाल्याचे एमआरव्हीसीचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष चंद गुप्ता यांनी सांगितले. लवकरच भूसंपादनालाही सुरुवात करण्यात येणार आहे. सध्या पश्चिम रेल्वेकडे चार आणि मध्य रेल्वेकडे पाच वातानुकूलित लोकल आहेत. लवकरच  आणखी दोन वातानुकूलित लोकल दाखल होणार आहेत. सध्या सेवेत असलेल्या लोकल प्रमाणेच त्या असतील.