मुंबई : आठवडाभरापासून नायर रुग्णालयातील हृदय शस्त्रक्रिया विभागातील काही भाग बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे बायपाससारख्या शस्त्रक्रिया होत नसल्याने रुग्णांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शस्त्रक्रिया विभागासाठी लागणाऱ्या उपकरणांची देयके प्रलंबित राहिल्यामुळे कंत्राटदारांनी उपकरणांचा पुरवठा बंद केला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयामध्ये १८०० खाटा असून दररोज साडेतीन ते चार हजार रुग्ण बाह्यरुग्ण विभागामध्ये उपचारासाठी येतात. हृदय शस्त्रक्रिया विभागामध्ये दररोज उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. यापैकी काही रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता भासते. हृदय शस्त्रक्रियेसाठी लागणारी महत्त्वपूर्ण उपकरणे नायर रुग्णालय प्रशासनाकडून पुरविण्यात येतात. मात्र रुग्णालयाला ही उपकरणे पुरविणाऱ्या कंत्राटदारांची देयके मागील काही दिवसांपासून प्रलंबित आहेत. देयके मंजूर होत नसल्याने कंत्राटदारानी उपकरणांचा पुरवठा आठवडाभरपूर्वी अचानक बंद केला. त्यामुळे रुग्णालयामध्ये होणाऱ्या शस्त्रक्रियांपैकी बायपास शस्त्रक्रिया आठवडाभरापासून बंद करण्यात आल्या आहेत. अचानक घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे रुग्णांना नाहक त्रास होत आहे. त्यांना शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयात जावे लागत आहे. कंत्राटदाराकडून उपकरणांचा पुरवठा बंद झाल्याने शस्त्रक्रिया बंद कराव्या लागल्याची माहिती नायर रुग्णालयातील सीव्हीटीएस विभागातील एका डॉक्टरने दिली.
हेही वाचा – वृद्ध व्यक्तीची ३० लाखांची सायबर फसवणूक
संपूर्ण शस्त्रक्रिया विभाग बंद झाला नसून, फक्त बायपास शस्त्रक्रिया बंद झाल्या आहेत. देयके मंजूर करण्याचे काम लेखा विभागाचे आहे. निवडणुकीच्या कामामुळे देयके मंजुरीला विलंब झाला असला तरी आता सर्व देयके मंजूर करून बँकेकडे पाठविण्यात आली आहेत. मात्र बँकेकडून देयकांची रक्कम अद्याप कंत्राटदाराच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेली नाहीत. या संदर्भात बँकेला देयकांची रक्कम तातडीने कंत्राटदारांना वर्ग करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे लवकरच कंत्राटदारांना त्यांच्या देयकाची रक्कम मिळेल आणि लवकरच शस्त्रक्रियागृहातील सुविधा सुरळीत होईल, अशी माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी दिली.
हेही वाचा – मुंबई : आधीच बेस्टची दुर्दशा त्यात नवीन समस्या, विकासकामांमुळे बसमार्ग वळवले
नायर रुग्णालयामध्ये डॉक्टरांकडून उपचार मिळत असले तरी औषधे बाहेरून खरेदी करावी लागतात. कॅल्शियमची औषधे, सिरींज, सुई, सलाईन, ग्लोव्हज, वेदनाशामक औषधे आदी बाहेरून खरेदी करावे लागत आहे. तसेच रुग्णालयातील एमआरआय यंत्रणा मागील अनेक महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे रुग्णांना ही चाचणी खासगी केंद्रांमध्ये करावी लागते. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याचे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले.