एकाच प्रकारचे शिक्षण घेऊनही प्रत्येक जण आपल्या आयुष्यात यशस्वी होतोच असे नाही. कारण, शिक्षण आणि प्रत्यक्ष नोकरी करताना आवश्यक अंगभूत गुणांचा मेळ घालता न आल्याने काही जण मागे राहतात. म्हणूनच वेळीच हे अंगभूत गुण विकसित करण्याकडे लक्ष द्या आणि त्यासाठी अकरावी ते पदवी शिक्षणापर्यंतची वर्षे हा योग्य काळ आहे, असा यशाचा मंत्र शनिवारी पार पडलेल्या ‘विद्यालंकार’ प्रस्तुत ‘लोकसत्ता-मार्ग यशाचा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशीच्या सत्रात वक्त्यांनी दिला.
ध्येयाने झपाटून अभ्यास
‘विद्यालंकार’च्या गणित विभागाचे प्रमुख हितेश मोघे यांनी अभ्यासाकरिता ध्येय्याने झपाटून अभ्यास करण्याचे महत्त्व या वेळी सांगितले. तर पुण्यातील ‘जेएसपीएम’ या शैक्षणिक संस्थेचे प्राध्यापक उल्हास माळवदे यांनी आपल्या संस्थांतर्फे चालविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांची माहिती दिली. तर ‘संकल्प आयएएस फोरम’चे संतोष रोकडे यांनी केंद्र व राज्य पातळीवर होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांची माहिती या वेळी दिली. आयएएस किंवा आयपीएस बनण्यासाठी पैसा, लाल दिव्याची गाडी, रुबाब या गोष्टींपेक्षाही या क्षेत्रातील आव्हाने ओळखून त्यांना सामोरे जाण्याच्या ईर्षेने या परीक्षांना सामोरे जा, असे आवाहन त्यांनी केले.
सॉफ्ट स्किल्सचे महत्त्व
आपल्या अंगभूत गुणांना उभारी देऊन त्यांच्या मदतीने इतरांशी सुलभपणे संवाद साधण्यासाठी कौशल्य म्हणजे ‘सॉफ्ट स्किल्स’. परंतु ही कौशल्ये नसल्याने शिक्षण असूनही विद्यार्थी भविष्यात नोकरीच्या बाजारात यशस्वी होत नाहीत. वेळेचे व्यवस्थापन, वाटाघाटी करण्याचे कसब, दुसऱ्याचे विचार आणि भावना समजून घेण्यासाठी लागणारा ‘इमोशनल कोशंट’ (ईक्यू), संभाषण-कला अशा अनेक गोष्टी या सॉफ्ट स्किल्समध्ये येतात. त्यामुळे ही कौशल्ये काही तासांच्या किंवा दिवसांच्या कार्यशाळांना हजेरी लावून साध्य करता येत नाहीत. त्यावर काही वर्षे प्रयत्नपूर्वक काम करावे लागते. अफाट वाचन, छंद, व्यायाम अशा अनेक लहान लहान गोष्टींची मदत ही कौशल्ये आत्मसात करण्यासाठी होते असा मोलाचा सल्ला ‘ह्य़ुमन रिसोर्स’ या क्षेत्रात काम करणाऱ्या व ‘हॉस्पिटॅलिटी फोरम’च्या संस्थापक गौरी खेर यांनी दिला. महाविद्यालय किंवा आंतरमहाविद्यालयीन स्तरावरील स्पर्धा अथवा कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊनही सॉफ्ट स्किल्सचा विकास करता येतो. आपल्याला ज्या विषयात आवड आहे किंवा ज्यात करिअर करायचे आहे, अशा क्षेत्रात काम करण्याचा अनुभवही याकरिता उपयोगी पडतो. परंतु हे करताना आर्थिक मोबदला किती मिळेल याचा विचार करू नका. पालकांनीही मुलांच्या या गोष्टींना लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याचे उद्योग म्हणून हिणवू नये, असेही सांगण्यास त्या विसरल्या नाहीत.
अॅप्टिटय़ूडचे महत्त्व
‘करिअर निवडताना..’ या विषयावर पुण्याच्या ‘ज्ञानप्रबोधिनी संशोधन संस्थे’च्या अभिक्षमता चाचणी (अॅप्टिटय़ूड) विभागाच्या नीलिमा आपटे यांनी मुलांना मार्गदर्शन केले. अभ्यासाचे नियोजन, पालक-विद्यार्थी संवाद इथपासून ते परीक्षा काळात येणाऱ्या ताणतणावांपर्यंतच्या मुद्दय़ांना त्यांनी या वेळी हात घातला. करिअर निवडीच्या बाबतीत गोंधळ असल्यास मुलांचा कल, आवड समजून घेऊन करिअर निवडण्याचे काही मार्ग असून त्यानुसार योग्य त्या अभिक्षमता चाचणी (अॅप्टिटय़ूड) करून घ्यावी, असा सल्ला त्यांनी या वेळी दिला.
करिअरच्या विविध संधी
करिअर सल्लागार विवेक वेलणकर यांनी दहावी-बारावीनंतरच्या विविध क्षेत्रांतील करिअरविषयक संधींबद्दल उपस्थित विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन केले. दहावीनंतर शाखा निवडताना किंवा बारावीनंतर करिअरची निवड करताना टक्के हा महत्त्वाचा घटक मानला जातो. मात्र केवळ चांगले टक्के मिळाले, म्हणून विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा, ही चूक करू नका. त्याऐवजी शाळेत असल्यापासून आवडते विषय कोणते, कोणत्या विषयांचा अभ्यास करायला आवडतो आदी गोष्टींकडे लक्ष द्या, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. तसेच कोणत्याही शाखेची निवड करून शिक्षण घेतले, तरी करिअरच्या समान संधी उपलब्ध असू शकतात, हेदेखील त्यांनी सोदाहरण दाखवून दिले. आयटीआय, हॉटेल मॅनेजमेंट, स्थापत्य विशारद, डिझायिनग, पत्रकारिता, चित्रपटविषयक अभ्यासक्रम यांना शाखेची मर्यादा नसते. त्यामुळे अमुक शाखेतच प्रवेश मिळायला हवा, असा अट्टहास विद्यार्थी आणि पालक यांनी टाळला पाहिजे, असेही ते म्हणाले. त्याचप्रमाणे अभियांत्रिकी आणि वैद्यकीय या दोन शाखांमधील प्रचलित अभ्यासक्रमांपेक्षा इतर अभ्यासक्रमांकडेही त्यांनी विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले. अप्लाइड सायन्सपेक्षा संशोधनावर भर देण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली.