मुंबई : बदलता काळ, धोरणे, बाजारपेठेची गरज या अनुषंगाने कला, विज्ञान, वाणिज्य, वैद्यकीय, अभियांत्रिकी, स्पर्धा परीक्षा, डिजिटल माध्यमे आदी विविध क्षेत्रांतील संधींची ओळख करून देणारी ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ ही कार्यशाळा २६ व २७ मे रोजी प्रभादेवीमधील रवींद्र नाट्य मंदिर येथे होणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्न व शंकाचे निरसन तज्ज्ञांकरवी करण्याचे व्यासपीठ या निमित्ताने मिळणार आहे.
दहावी, बारावीनंतर करिअरचा मार्ग निवडताना कोणती काळजी घ्यावी, कोणत्या क्षेत्रात करिअरच्या अधिक संधी निर्माण झाल्या आहेत, कोणत्या क्षेत्रात अधिक वाव आहे यांसह विविध क्षेत्रे, नव्या संधीची सखोल माहिती, तणावाला सामोरे कसे जायचे, नव्या शिक्षण धोरणामुळे होणारे बदल आदी विविध विषयांवर विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना थेट तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. त्याचबरोबर विविध शंकांचे निरसनही होणार आहे. करिअरची वाट दाखविणाऱ्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेत दोन्ही दिवस सारख्याच विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. यामुळे विद्यार्थी व पालक त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही एका दिवसाची निवड करू शकतात. सदर कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि शंकानिरसनाची संधी कधी?
२६ व २७ मे २०२३ (दोन्ही दिवशी सारखेच विषय असल्यामुळे, विद्यार्थी व पालक त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही एका दिवसाची निवड करू शकतात.)