पोटदुखीवर उपचार करण्यासाठी गेलेली महिला गर्भवती आहे की नाही याची तपासणी न करताच औषधे देणे मुलुंड येथील एका स्त्रीरोगतज्ज्ञ महिलेला चांगलेच महागात पडले. ग्राहक न्यायालयाने या डॉक्टरला वैद्यकीय निष्काळजीपणा केल्याप्रकरणी दोषी ठरवत साडेतीन लाख रुपये नुकसानभरपाईसह कायदेशीर प्रक्रियेसाठीचा खर्च म्हणून १५ हजार रुपये देण्याचे आदेश दिले. आशिर्वाद नर्सिग होममधील ही घटना असून डॉ. किशोरी कदम असे त्या डॉक्टरांचे नाव आहे.
पोटात दुखत असल्यामुळे जानेवारी २००८ मध्ये तक्रारदार महिला डॉ. कदम यांच्याकडे गेली होती. कदम यांनी तपासणी केल्यानंतर तिला आठवडय़ाचे औषध दिले आणि दुखणे थांबले नाही तर विशेष तज्ज्ञांकडून तपासणी करून घेण्याचा सल्ला दिला. दुखणे न थांबल्याने सदर महिला विशेष तज्ज्ञाकडे तपासणीसाठी गेली. मात्र येथील उपचारानेही दुखणे न थांबल्याने संबंधित महिला दादर येथील डॉक्टरकडे गेली. मात्र दुखणे बरे न झाल्याने, तक्रारदार महिला अखेर स्त्रीरोगतज्ज्ञाकडे गेली. तिथे चाचणीत ही महिला १६ आठवडय़ांची गर्भवती असल्याचे उघड झाले. मात्र यापूर्वीच्या औषधांमुळे गर्भावर परिणाम होण्याची शक्यचा असल्याचे स्पष्ट करीत या स्त्रीरोगतज्ज्ञाने तिला गर्भपात करण्याचा सल्ला दिला.  महिलेने ग्राहक न्यायालयात धाव घेत यास डॉक्टर जबाबदार असल्याचा दावा करीत नुकसानभरपाई मागितली.

Story img Loader