८२ वर्षांच्या वृद्धाला वेळीच आवश्यक ते वैद्यकीय उपचार न केल्याप्रकरणी दोषी ठरवत संबंधित वृद्धाच्या मुलाला ४.७८ लाख रुपयांचा वैद्यकीय खर्च परत करण्यासह एक लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दक्षिण मुंबई जिल्हा ग्राहक वाद निवारण मंचाने वृद्धाश्रमाला दिले आहेत.
मुलुंड येथील हेमंत ठाकूर यांच्या वडिलांना मानसिक आजार होता. त्यामुळे त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवणे गरजेचे होते. दोघेही पती-पत्नी नोकरीला असल्याने वडिलांसाठी वेळ देणे शक्य नव्हते. त्याचवेळी त्यांना ‘डिग्निटी लाईफस्टाईल ट्रस्ट’ या वृद्धाश्रमाबाबत माहिती मिळाली. त्यांच्याकडून उत्तम दर्जाची वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच वृद्धांची व्यक्तीश: काळजी घेतली जात असल्याचे कळल्यावर आपण वडिलांना ट्रस्टच्या नेरळ येथील वृद्धाश्रमात ठेवण्याचा निर्णय घेतल्याचा दावा ठाकूर यांनी १५ सप्टेंबर २०११ रोजी ग्राहक मंचाकडे केलेल्या तक्रारीत केला आहे.
ट्रस्टला त्यांनी एकूण ५.२९ लाख रुपये दिले. त्यातील चार लाख रुपये परत मिळणार होते, तर ९६ हजार रुपये देखभाल खर्चाचे होते आणि उर्वरित ३३, १०० हजार हे इन्व्हर्टर आणि रुग्णालयाच्या नोंदणीसाठी दिले होते. ठाकूर यांनी वडिलांना फेब्रुवारी २००८ मध्ये ट्रस्टच्या नेरूळ येथील वृद्धाश्रमात दाखल केले होते. त्यानंतर मधुमेहामुळे वडिलांची प्रकृती बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे ठाकूर यांना १ जून २००८ रोजी कळविण्यात आले. परंतु रुग्णालयात दाखल करण्याच्या एक आठवडा आधीपासूनच वडिलांचा मधुमेह वाढल्याचे आणि आवश्यक ते वैद्यकीय उपचार वेळेत न दिल्यानेच वडिलांची प्रकृती बिघडल्याचे ठाकूर यांना समजले. त्यामुळे ६ जून २००८ रोजी वडिलांना पुन्हा घरी नेण्याची तयारी दाखवली.
परंतु त्यांची प्रकृती ढासळतच गेली. त्यामुळे १५ जून २००८ रोजी ठाकूर यांनी त्यांना मुलुंड येथील रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर १४ जुलै २००८ रोजी त्यांचा मृत्यू झाला. सतत विनंती करूनही रुग्णालयातर्फे ठाकूर यांना पैसे देण्यात आले नाहीत. उलट ठाकूर यांच्या वडिलांची वृद्धाश्रमात दाखल केल्यानंतर तीन महिन्यांतच प्रकृती सुधारल्याचा दावा करण्यात आला. शिवाय ठाकूर यांनी वैद्यकीय सल्ल्याचे शुल्क दिले नाही आणि विशेष अतिदक्षता विभाग नसल्याचे माहीत असतानाही त्यांना वृद्धाश्रमात पाठविल्याचा दावा केला. मात्र मंचाने वृद्धाश्रमाच्या प्रसिद्धी पुस्तिकेत विसंगती असल्याचे नमूद करीत निष्काळजीपणा केल्याप्रकरणी वृद्धाश्रमाला दोषी धरून ठाकूर यांना भरलेल्या ४ लाख रक्कमेसह एक लाख रुपयांच्या नुकसान भरपाईचे आदेश दिले.