राज्यातील वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यामध्ये सध्याची पोलीस यंत्रणा कालबाह्य़ ठरली असून पोलीस महासंचालक आणि गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बेफिकीर वृत्तीने शासनाची दिशाभूल करीत आहेत, असा आरोप निवृत्त पोलीस महानिरीक्षक सुरेश खोपडे यांनी केला आहे.
नागरिक कृती समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना खोपडे यांनी सांगितले की, सध्याची पोलीस यंत्रणा कालबाह्य़ असल्यानेच राज्यात महिलांवर वाढते अत्याचार, प्रसारमाध्यमांवर हल्ले, धुळे येथे जातीय दंगल आदी प्रकार घडले आहेत. मार्च २०११ पासून या यंत्रणेसाठी पर्याय सुचविला असूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. पोलीस आणि अल्पसंख्याकांमधील दरी वाढत चालली असून ती कमी करण्यासाठी पोलिसांच्या कामकाजाची पुनर्रचना करणे, त्यांची वैयक्तिक आणि व्यावसायिक क्षमता वाढविणे, गुन्हेगारी रोखण्यासाठी नवनवीन मार्ग अनुसरण्याबाबतच्या योजना पोलीस महासंचालकांना आणि अतिरिक्त मुख्य सचिवांना पाठविण्यात आल्या होत्या. मात्र त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही, असे खोपडे यांनी सांगितले. आपण सुचविलेल्या योजनांकडे दुर्लक्ष करतानाच केवळ पोलीस ठाण्यांची आणि पोलिसांची संख्या वाढविणे, सीसीटीव्ही कॅमेरे लावणे आदी शिफारशी करीत गृहमंत्री आणि मंत्रिमंडळाची दिशाभूल करण्यात येत आहे, असे सांगून खोपडे यांनी पर्यायी योजनांचा विचार एक महिन्यात करण्यात आला नाही तर नागरिक कृती समितीच्या वतीने पोलीस महासंचालक आणि अतिरिक्त मुख्य सचिवांना जाब विचारण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

Story img Loader