मुंबई: मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या व पी. डि’मेलो मार्गाला जोडणाऱ्या १५४ वर्ष जुन्या कर्नाक पुलाचे बांधकाम सुरू असून हा पूल जून २०२५ पर्यंत सुरू होऊ शकणार आहे. या पुलाची एक तुळई स्थापन करण्यात आली असून दुसऱ्या तुळईचे सुटे भाग प्रकल्पस्थळी दाखल झाले आहेत. अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी गुरुवारी या कामाची पाहणी केली. पुलाच्या बांधकामाचे वेळापत्रक पालिका प्रशासनाने तयार केले असून ५ जून २०२५ पर्यंत कर्नाक पूल वाहतुकीस खुला करण्याचे उद्दीष्टय मुंबई महानगरपालिका प्रशासनाने ठेवले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दक्षिण मुंबईतील मशीद बंदर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी कर्नाक पूल महत्त्वाचा आहे. लोकमान्य टिळक मार्गावरील कर्नाक पूल धोकादायक झाल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेने या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी गुरुवारी प्रकल्पस्थळी भेट देऊन कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.

हेही वाचा >>>कुर्ला बस अपघात: मृत महिलेचे दागिने चोरणाऱ्याविरोधात अखेर गुन्हा दाखल

या प्रकल्पांतर्गत ५१६ मेट्रिक टन वजनाची दक्षिण बाजुची लोखंडी तुळई (गर्डर) रेल्वे भागावर स्थापित करण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. आता, दुस-या बाजुच्या लोखंडी तुळईचे (गर्डर) ४२८ मेट्रिक टन (८३ टक्के) सुटे भाग प्रकल्पस्थळी दाखल झाले आहेत. उर्वरित सुटे भाग दिनांक २० डिसेंबरपर्यंत प्रकल्पस्थळी दाखल होणे अपेक्षित आहे. तुळईच्या सुटे भागांचे जोडकाम, तुळई स्थापित करण्याची कार्यवाही, पोहोचमार्ग (अॅप्रोच रोड) बांधणी, भार चाचणी (लोड टेस्ट) आदी कामकाजाचे सूक्ष्म नियोजन करून वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून त्यानुसार ५ जून २०२५ हा पूल वाहतूकीसाठी खुला होणार आहे.

जानेवारी महिन्याच्या मध्यापर्यंत तुळईच्या सुट्या भागांचे जोडकाम पूर्ण केले जाणार आहे. दिनांक १८ आणि १९ जानेवारी २०२५ रोजी रेल्वे ‘ब्लॉक’ मिळण्याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाकडे विनंती करण्यात आली आहे. उपरोक्त कालावधीत रेल्वे ‘ब्लॉक’ मिळाल्यानंतर दिनांक १९ जानेवारीपर्यंत तुळई स्थापित करण्याची कार्यवाही पूर्ण केली जाईल. त्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून मध्य रेल्वेसोबत समन्वय साधण्यात येत असल्याचे बांगर यांनी सांगितले.

हेही वाचा >>>चेंबूरमध्ये पालिकेने खोदलेल्या खड्यात पडून इसमाचा मृत्यू, कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल

अधिक माहिती देताना बांगर म्हणाले, रेल्वे मार्गावर तुळई स्थापन करण्याची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर पुढील कामकाजाचे सूक्ष्म नियोजन करून टप्पेनिहाय किती कालावधी लागेल हे निश्चिती करण्यात आले आहे. त्यानुसार, पूर्व आणि पश्चिम दिशेच्या पोहोचमार्गासाठी (ॲप्रोच रोड) खांब बांधणीचा (पाईल फौंडेशन) पहिला टप्पा १५ मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करणे, १७ एप्रिल २०२५ पर्यंत खांब उभे करणे, ३ मे २०२५ पर्यंत पोहोच रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि १ जून २०२५ रोजी भार चाचणी (लोड टेस्ट) करण्याचे नियोजन आहे. वेळापत्रकानुसार अपेक्षित कार्यवाही पूर्ण झाल्यास दिनांक ५ जून २०२५ पर्यंत कर्नाक पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. मात्र, त्यासाठी दिनांक १८ आणि १९ जानेवारी २०२५ रोजी मध्य रेल्वे प्रशासनाने ‘ब्लॉक’ मंजूर करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यादृष्टीने मध्य रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात असल्याचे बांगर यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Carnac bridge to be inaugurated in june additional commissioner inspects bridge work mumbai print news amy