अनिश पाटील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

असुरक्षित जागी उभ्या करणे हे सत्तर टक्के गाडय़ांच्या चोरीला जाण्याचे मुख्य कारण आहे. त्यामागे मोठय़ा टोळय़ा कार्यरत आहेत. मोटार चोरी करणारे इतके सराईत असतात की एखादी मोटार पळवण्यासाठी त्यांना केवळ तीन मिनिटे लागतात. मुंबईतील चोरीला गेलेल्या मोटारींची अगदी नेपाळमध्येही विक्री करण्यात आली आहे.

मुंबईतून दिवसाला सरासरी ८ ते १० मोटारगाडय़ा चोरीला जातात. यावर्षी गेल्यावर्षीच्या तुलनेत मोटारगाडय़ांच्या चोरीमध्ये घट झाली असली तरी, जुलै महिन्यापर्यंत शहरात दीड हजारांहून अधिक मोटारी चोरीला गेल्या. गाडय़ा या असुरक्षित जागी उभ्या करणे हे सत्तर टक्के गाडय़ांच्या चोरीला जाण्याचे मुख्य कारण आहे. त्यामागे मोठय़ा टोळय़ा कार्यरत आहेत. मुंबईतील चोरीला गेलेल्या मोटारींची अगदी नेपाळमध्येही विक्री करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> अधोविश्व : नोकरीसाठी त्या आल्या होत्या, पण.. 

 मोटार चोरी करणारे इतके सराईत असतात की एखादी मोटार पळवण्यासाठी त्यांना केवळ तीन मिनिटे लागतात. मोटारचोर शक्यतो रात्री चोरी करतात. मोटारींच्या शोधात ते शहरभर फिरतात. त्यानंतर असुरक्षित स्थळी गाडी पार्क केलेली आढळली की चोर त्या मोटारीच्या बाजूला दुसरी मोटार उभी करतात. त्यानंतर टोळीतील एक जण प्रथम मोटारीची पेट्रोलच्या टाकीचे कव्हर अथवा बूट लॉक तोडतो. त्यानंतर त्याच्या म्होरक्याला संकेत देतो. काही सेकंदात मोटारीची बनावट चावी तयार केली जाते. अगदी अध्र्या ते एक मिनिटात चावी तयार करणारे सराईत चोरही आहेत. तंत्रज्ञानाच्या मदतीनेही बनावट चाव्या तयार केल्या जातात. तसेच मोटारगाडय़ा भाडय़ाने घेऊनही त्या चोरल्या जातात. त्यानंतर बनावट वाहन क्रमांकाच्या साहाय्याने मोटार सुरू करून ती पळवून शहराबाहेर नेण्यात येते. त्यामुळे गाडीच्या मालकाने चोरीची तक्रार नोंदवल्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षाला चोरीला गेलेल्या मोटारीचा क्रमांक देऊनही ती शोधणे आणि चोरांना पकडणे कठीण होते. त्यानंतर चोरी करण्यात आलेल्या मोटारी भिवंडी, पनवेल, नालासोपारा वगैरे ठिकाणी नेण्यात येतात. त्यानंतर ही टोळी चोरीची मोटारगाडी खरेदी करणाऱ्या दुसऱ्या टोळीशी संपर्क साधून मागणीनुसार मोटार तयार असल्याचे सांगते. त्यानंतर मोटार आणण्यासाठी टोळय़ा त्यांच्या चालकाला पाठवतात. हे चालक दलाली घेऊन या टोळय़ांसाठी काम करतात.

या चालकांना बहुधा या टोळय़ा आपण बँक अधिकारी असल्याचे भासवतात व हप्ते थकवल्यामुळे जप्त केलेली कार आणण्याचे काम त्यांना सोपवण्यात येत असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर ठरलेल्या ठिकाणी मोटार आणल्यानंतर या चालकाला तीन ते चार हजार रुपये दलाली दिले जाते. नंतर या गाडय़ा दुसऱ्या राज्यांत नेल्या जातात. या टोळय़ांकडे त्या राज्यातील बनावट वाहन क्रमांक तयारच असतात. त्या वाहन क्रमांक पाटय़ा या मोटारीला लावण्यात येते. हा सर्व व्यवहार दूरध्वनी व ऑनलाइन बँकिंगच्या माध्यमातून होत असल्यामुळे फारतर पोलिसांना दुसऱ्या टोळीने नेमलेल्या चालकापर्यंत पोहोचता येते. काही टोळय़ांमध्ये यापेक्षा अधिक मोठय़ा प्रमाणात काम करते. प्रत्येक राज्यात त्यांच्यासाठी काम करणारी वेगळी माणसे असतात. टोळीतील एक गट एक कार चोरतो, तर दुसरा गट रंग बदलतो, परवाना क्रमांक, इंजिन क्रमांक व चेसी क्रमांक बदलते, तिसरा गट ठरलेल्या ठिकाणी गाडी पोहोचवण्याचे काम करतो. मुंबईतून चोरलेल्या मोटार मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, नोयडा, केरळ, कर्नाटक, उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार, कोलकाता, झारखंड, ओडिशा, आसाम आणि नेपाळमध्ये विकण्यात येतात. पुणे पोलिसांनी काही वर्षांपूर्वी अफसर ऊर्फ बिजली या कुख्यात चोराला अटक केली होती. तो तर नेपाळमध्ये कार चोरायचा.

हेही वाचा >>> अधोविश्व : दहशतवादी आणि पैशांचे गैरव्यवहार 

मोटारींच्या चोर बाजारात वॅगनआर, स्विफ्ट, टाटा नेक्सॉन, क्रेटा, अर्टिगासह आलिशान मोटारगाडय़ांना अधिक मागणी आहे. या सर्व गाडय़ांसाठी एका चावीचा वापर होतो. तर काही हायक्लास गाडय़ांसाठी एकापेक्षा अधिक चाव्यांचा वापर होतो. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये मोटरगाडी चोरी करणाऱ्या अनेक टोळय़ा सक्रीय आहेत. बरेच चोर व बनावट चावी बनवणारे अनेक म्होरके उत्तर प्रदेशातील प्रतापगडशी संबंधित आहेत. हे चोर मोटारगाडी चोरण्यासाठी मुंबईत येतात व त्यानंतर आपापल्या शहरांमध्ये पळ काढतात. ते प्रत्येक गाडीमागे एक ते पाच लाख रुपये कमावतात. मुंबईत सध्या ३५ हून अधिक गाडय़ा चोरणाऱ्या टोळय़ा कार्यरत आहेत. त्यातील बहुतांश पूर्वाश्रमीचे टॅक्सीचालक अथवा मेकॅनिक आहेत. निवडणुकांच्या काळ हा चोरीच्या मोटारींसाठी सुगीचा असतो. तसेच चोरीच्या गाडय़ांचा सर्वाधिक वापर गुजरातमध्ये दारूच्या तस्करीसाठी केला जातो. त्यासाठी दिव-दमण, राजस्थान या राज्यांमध्ये चोरीच्या गाडय़ांना अधिक मागणी आहे. याशिवाय घातपाती कारवायांमध्येही चोरीच्या गाडय़ांचा वापर झाल्याचे अनेक दाखले आहेत. १३/७ मुंबईतील तिहेरी स्फोटांमध्येही चोरीच्या गाडय़ांचाच वापर करण्यात आला होता. एटीएसने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार या स्फोटांसाठी नकी अहमद वासी अहमद व नदीम शेख या दोन आरोपींनी सीपी टँक व गिरगाव परिसरातून दोन गाडय़ा चोरल्या होत्या. त्यात स्फोटके ठेवून बॉम्बस्फोट घडविण्यात आला. त्यामुळे मोटारगाडी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी अधिक सतर्क राहून काम करण्याची आवश्यकता आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cars stolen from mumbai sold in nepal zws
Show comments