मुंबई : पैसे दामदुप्पट करण्याचे आमीष दाखवून ४४४ जणांची २० कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक करणाऱ्या दाम्पत्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रईसा खान पूनावाला उर्फ रईसा बेग आणि पती मुस्तफा बेग यांनी सुमारे ९० दिवसांत पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून आणखी ५६ जणांची सव्वातीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे याप्रकरणातील फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची संख्या ५०० वर पोहोचली आहे.
रईसाची मोठी बहीण बिल्किस अफरोज शेखने (४८) या दाम्पत्यावर पहिला गुन्हा दाखल केला होता. रईसाची दुसरी बहीण झबीन शेखने (५६) हा दुसरा गुन्हा दाखल केला आहे. ती सांताक्रुझ येथे वास्तव्यास आहे. तक्रारीनुसार जानेवारी २०१४ ते डिसेंबर २०१६ दरम्यान दौलत नगर, सांताक्रूझ येथे राहणाऱ्या आरोपी दाम्पत्याने गुंतवणूकदारांना ९० ते १०० दिवसांत दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून आर. के. एन्टरप्रायझेस या कंपनीत पैसे गुंतवण्यास सांगितले.
हेही वाचा >>>पालघर, अलिबाग एमएमआरडीएकडे! विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती
तक्रारदार झबीन यांनी ९ लाख रुपये आरोपी दाम्पत्याकडे गुंतवले. त्यांच्या बोलण्यावरून इतरांनीही या योजनेत पैसे गुंतवले. आरोपी दाम्पत्याने पुढे सबबी सांगण्यास सुरूवात केली. तसेच धनादेशावर स्वाक्षऱ्या घेतल्या. दुसऱ्या गुन्ह्यांमध्ये ५६ जणांची तीन कोटी १८ लाख रुपयांची फसणूक करण्यात आली आहे. दोन्ही प्रकरणात मिळून आतापर्यंत ५०० जणांची फसवणूक झाली आहे .फसवणूक झालेल्या व्यक्तींनी मुलांची लग्न, हज यात्रेसाठी साठवलेले पैसे आरोपी महिलेला दिले. पण त्यापैकी कोणालाच दुप्पट रक्कम मिळाली नाही. तसेच आरोपींकडून देण्यात आलेले धनादेशही वठले नाहीत. महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण (एमपीआयडी) कायद्याअंतर्गत याप्रकरणी सांताक्रुझ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.