महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरावर पहिला हक्क आहे तो मराठी माणसांचा. कारण मराठी माणसांनीच मुंबई घडवली आहे. मात्र मराठीची गळचेपी हे आत्तापर्यंत आपण जे ऐकत होतो त्या गोष्टी आता निदर्शनासही येऊ लागल्या आहेत. मुंबईतल्या मुलुंड या उपनगरात तृप्ती देवरुखकर या महिलेला मराठी असल्याने जागा नाकारण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ तृप्ती देवरुखकर यांनी त्यांच्या फेसबुकवर पोस्ट केला आणि तो वाऱ्यासारखा व्हायरल झाला. आता या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तृप्ती यांना ऑफिस थाटण्यासाठी जागा हवी होती. मात्र मराठी नॉट अलाऊड म्हणत ही जागा नाकारण्यात आली होती. ज्या गुजराथी पिता पुत्रांनी हे केलं त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं हे प्रकरण काय आहे?
तृप्ती देवरुखकर नावाच्या एका महिलेनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. मुलुंड वेस्टमधल्या ‘शिवसदन’ नावाच्या इमारतीमध्ये घर बघण्यासाठी त्या गेल्या होत्या. मात्र, सोसायटीचे गुजराती सेक्रेटरी व त्यांच्या वडिलांनी “महाराष्ट्रीयन व्यक्तींना आम्ही घर देत नाही” असं सांगून नकार दिला. यातून वाद वाढला व देवरुखकर यांनी त्या बाचाबाचीचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट करायला सुरुवात केली. पण त्यावरूनही या बापलेकानं अरेरावी करत त्यांचा मोबाईल काढून घेतला. त्यांनी आपल्या पतीलाही मारल्याचा दावा तृप्ती देवरुखकर यांनी फेसबुकवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये केला आहे.
हे पण वाचा- “मुंबईत मराठी महिलेला घर नाकारलं जाणं ही बाब…”, महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरांनी घेतली घटनेची दखल
घडला प्रकार तृप्ती देवरुखकर यांनी सोशल मीडियावर टाकल्यानंतर मनसेनं त्याची दखल घेऊन थेट शिवसदन सोसायटी गाठली. त्यांनी मला त्या सोसायटीत बोलवून घेतलं आणि त्या दोघांनाही जाब विचारला. त्या दोघांनी माफीही मागितली. आपण मनसे पदाधिकाऱ्यांचे आभारी आहोत, असं तृप्ती देवरुखकर यांनी नंतर पुन्हा एक व्हिडिओ पोस्ट करून सांगितलं.
हे पण वाचा- “गुजराती समाजाची हुजरेगिरी करुन मराठी माणसाला…”, ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवरुन काँग्रेसचा सरकारवर आरोप
तृप्ती देवरुखकर यांनी व्हायरल व्हिडीओत त्यांनी काय म्हटलं आहे?
“जितके म्हणून राजकीय पक्ष आहेत त्या सर्वांनी मराठी पाट्या काढा. मराठी माणसाचा राजकीय वापर करणं बंद करा. मुंबईत मराठी माणसाची काय किंमत आहे ते जाणवलं. मुलुंड वेस्टमध्ये शिवसदन सोसायटीत ऑफिससाठी जागा पाहायला गेल्यानंतर गुजराती सेक्रेटरीने मराठी माणसांना घरं देणार नाही असं सांगितलं. नियमावली मागितली तर धमकी दिली. पोलिसांना सांगा नाहीतर आणखी कुणाला सांगा असं सांगत हात पकडला आणि माझ्या पतीला धक्काबुक्की केली. शूट करायला गेले तर फोन काढून घेतला. यांना एवढा माज आलाय की महाराष्ट्रात राहून मराठी माणसाला सांगतात की तुम्हाला सोसायटीत परवानगी नाही. मराठीच्या नावावर राजकारण करणारे कुठे आहेत? अशा माणसांना पोसत असाल तर दुर्दैव आहे. हे माझं रडणं नाही तर संताप आहे. आज मला जो अनुभव आला तो किती मराठी माणसांना आला असेल? किती जणांना घरं नाकारली गेली असतील?” असे प्रश्न विचारत तृप्ती देवरुखकर यांनी व्हिडीओ पोस्ट केला. जो चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर मनसेचे नेते, पदाधिकारी या सोसायटीत पोहचले. त्यांनी इशारा दिल्यानंतर या सोसायटीतल्या लोकांनी माफी मागितली. यानंतर आता मनसेने आणखी एक व्हिडीओ पोस्ट करत आपलं म्हणणं मांडलं आहे.