राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगढी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांद्रे येथील एका कार्यक्रमात हातात तलवार घेत तिचं प्रदर्शन केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आलं असल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे.

घटनेचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बॉम्बे पोलीस आणि शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वांद्रे येथील रंगशारदा भवनमध्ये रविवारी रात्री इम्रान प्रतापगढी यांच्या स्वागतासाठी कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी या नेत्यांनी हातात तलवारी घेतल्या होत्या. वर्षा गायकवाड, अस्लम शेख आणि इम्रान प्रतापगढी यांनी हातात तलवार घेतल्याचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

दरम्यान भाजपा नेते मोहित कंबोज यांनी आपण दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचा दावा केला आहे. त्यांनी ट्वीट केलं आहे.

दरम्यान पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

महाराष्ट्र काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलच्या आढावा बैठकीत सहभागी होण्यासाठी प्रतापगढी रविवारी मुंबईत आले होते. वर्षा गायकवाड या मुंबईतील धारावी विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत तर अस्लम शेख मालाडचं (पश्चिम) प्रतिनिधित्व करतात.