अभिनेते राजेश खन्ना यांचे गेल्या वर्षी निधन झाल्याची बाब विचारात घेत मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या विरोधात दाखल १० वर्षांपूर्वीच्या बेनामी मालमत्ता प्रकरणाची फाईल मंगळवारी बंद केली.
जुहू येथील ‘आशीर्वाद मिनी थिएटर’ या बेनामी मालमत्तेत पैसे गुंतविल्याच्या आरोपावरून प्राप्तिकर खात्याने खन्ना यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र त्यांची त्यातून निर्दोष सुटका झाल्याने प्राप्तिकर खात्याने २००३ मध्ये त्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेत अपील दाखल केले होते. न्यायमूर्ती अभय ठिपसे यांच्यापुढे या अपिलावर सुनावणी झाली. त्या वेळी खन्ना यांचे निधन झाल्याचे लक्षात घेता त्यांच्याविरुद्धचे हे प्रकरण बंद करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.
प्राप्तिकर खात्याच्या दाव्यानुसार, खन्ना यांनी या मिनी थिएटरमधून येणारे पैशांबाबत आणि बेनामी आर्थिक व्यवहारांबाबत कधीच खुलासा केला नाही. परंतु त्यांनी या थिएटरमध्ये पत्नी डिंपल हिच्या नावे पैसे गुंतविले होते. खटल्याच्या वेळी खन्ना यांनी आपल्याला या थिएटरबाबत काहीच माहीत नसल्याचा आणि पैसे गुंतविले नसल्याचा दावा केला होता. डिम्पल यांनीही न्यायालयासमोर ही भूमिका घेतली होती आणि खन्ना यांच्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे असल्याचा दावा केला होता. २७ डिसेंबर २००७ रोजी अतिरिक्त मुख्य महानंगरदंडाधिकारी सी. के. थूल यांनी खन्ना यांना पुराव्याअभावी निर्दोष ठरविले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा