मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विशेष सरकारी अभियोक्ता प्रवीण चव्हाण यांच्याविरोधात कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा, तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. सत्र न्यायालयात घडलेल्या या प्रकरणाबाबत कुलाबा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा – मुंबई : झोपमोड करणाऱ्या वृद्ध आईची हत्या
हेही वाचा – कॉफीतून गुंगीचे औषध देऊन सहप्रवाशाला लुटले, आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक
दहिसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या सुनावणीसाठी रमेश कदम २१ जून रोजी सत्र न्यायालयात आले होते. त्यावेळी रमेश कदम यांच्याकडे पाहून चव्हाण यांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ करत ‘तू जे पैसे खाल्ले त्यातील १० कोटी मला दे, नाहीतर जेलमधून तू कधीच सुटणार नाही’ असे धमकावल्याचे तक्रारीत म्हटले आहे. रमेश कदम यांनी कुलाबा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मंगळवारी कुलाबा पोलिसांनी प्रवीण चव्हण यांच्या विरोधात ३८४, ५०६ भादवी कलमासह ३ (१) आर, ३ (१) एस, अनुसूचीत जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.