लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : शिवडी येथे ५० वर्षीय व्यावसायिकाची हत्या केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हसमभाई काण्या असे मृत व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी पोलीस तिघांचा शोध घेत आहे.
शिवडी येथील ब्रीक बंदर नजिकच्या गॅरेजजवळ ही घटना घडली. तक्रारदार उस्मान अहमद ऊर्फ शकील शेख हे वांद्रे येथील बेहरामपाडा परिसरात राहतात. शिवडीतील ब्रीक बंदर परिसरात त्यांच्या मालकीचे एक गॅरेज आहे. त्यांच्याच गॅरेजच्या बाजूला हसमभाई काण्या यांचा भंगार विक्रीचा व्यवसाय आहे. गेल्या नऊ वर्षांपासून ते एकमेकांना ओळखतात. ते चांगले मित्र होते.
आणखी वाचा-सावंत यांना वरळीतून कमी मताधिक्य; मुंबादेवी, भायखळ्यातील मताधिक्यामुळे विजय सुकर
शनिवारी दुपारी एक वाजता शेख उस्मान त्यांच्या गॅरेजमध्ये काम करत होते. यावेळी तिथे तीन तरुण आले आणि त्यांनी जुन्या वादातून हसमभाई यांच्यावर चाकूने हल्ला केला. यावेळी शेख उस्मान यांनी तिघांनाही जाब विचारला असता त्यांनी त्यांनाच जिवे मारण्याची धमकी दिली. या हल्ल्यानंतर ते तिघेही दुचाकीवरून लक्ष्मी पेट्रोल पंप आणि सीआरपीएच्या दिशेने पळून गेले. हल्ल्यात जखमी झालेल्या हसनभाई यांना शेख उस्मानसह इतरांना तातडीने भायखळा येथील मसीना रुग्णालयामध्ये दाखल केले. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.