मुंबई : भाजप आमदार प्रसाद लाड आणि त्यांच्या आईविरोधात फेसबुकवर बदनामीकारक पोस्ट केल्याप्रकरणी मुंबईत दोन ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवक काँग्रसच्या पदाधिकाऱ्याविरोधात शीव व चुनाभट्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हेही वाचा >>> दाभोलकर हत्या प्रकरण: खटला सुरू झाल्याने उच्च न्यायालयाच्या देखरेखीची गरज नाही
ठाणे युवक काँग्रेसचे सरचिटणीस मयुर एन बोरोले यांच्या खात्यावरून ४ ते २० डिसेंबरदरम्यान लाड व त्यांच्या आईबद्दल अपमानास्पद पोस्ट करण्यात आली होती. याप्रकरणी प्रसाद लाड यांचे स्विय सहायक देवीदास नारायण मंगवडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चुनाभट्टी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ५०० आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६७ नुसार हा गुन्हा दाखल केला आहे. शीव पोलीस ठाण्यातही याप्रकरणी भादंवि कलम ५०० व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माटुंगा परिसरात राहणारे आशिष साळकर यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. तक्रारीनुसार या पोस्टमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखवल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानुसार मयुर एन. बोराले नावाच्या फेसबुक खातेधारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.