मुंबई : नववर्षाच्या पूर्वसंध्येला विमानतळाजवळील पंततारांकीत हॉटेलमध्ये पार्टीचे आयोजन करून सव्वा कोटी रुपये थकवणाऱ्या इंटरटेंमेंट कंपनीच्या मालकाविरोधात सहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हॉटेलला एक कोटी ३८ लाख रुपये न देता फसवणूक केल्याची तक्रार सहार पोलिसांना प्राप्त झाली होती.
अंधेरी पूर्व येथील पंचतारांकीत हॉटेलमध्ये दरवर्षी नववर्षाच्या पूर्वसंध्येला पार्टीचे आयोजन करण्यात येते. त्याचे आयोजन इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी करते. त्यानुसार एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या मालकाने ऑक्टोबर २०२४ मध्ये हॉटेलच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतली. त्याबाबत अनेक वेळा चर्चा झाली. अखेर २० डिसेंबरला हॉटेल व कंपनीत एक करार झाला. त्यानुसार हॉटेल नववर्षाच्या इव्हेंटसाठी जागा, जेवण, मद्य, सुरक्षा व परवाना पुरवणार होते. त्या बदल्यात हॉटेलला एक कोटी ७८ हजार रुपये देण्याचे मान्य करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या पार्टीसाठी कलाकार, निर्मिती व तिकीटांची विक्री यांची जबाबदारी इव्हेट मॅनेजमेंट कंपनीची होती, असे तक्रारीत म्हटले आहे.
हेही वाचा…डोळ्यात मिरचीपूड टाकून महिलेच्या लुटण्याचा प्रयत्न
तसेच ५०० जणांना नववर्षाच्या पार्टीत निःशुल्क प्रवेश देण्यात येणार होता. त्यात २५० जण हॉटेलचे, तर २५० जण इव्हेंन्ट मॅनेटमेंट कंपनीचे होते. या पार्टीसाठी ३५० तिकीटांची विक्री झाली. यासाठी हॉटेलला मिळणारी एक कोटी ७८ लाख रुपयांची रक्कम पार्टीपूर्वी हॉटेलला देण्याचे ठरले होते. पण त्यानंतरही टाळाटाळ करून पार्टीनंतर संबंधित रक्कम देण्याचे आश्वासन हॉटेलला देण्यात आले. अद्याप त्यापैकी केवळ ४० लाख ५० हजार रुपये हॉटेलला मिळाले असून उर्वरित रक्कम हॉटेलला मिळाली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी हॉटेलच्या महाव्यवस्थापकाने सहार पोलिसांकडे तक्रार केली असून पोलिसांनी सोमवारी इव्हेंट कंपनीच्या मालकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगिलते.