कळव्यामध्ये उघडय़ा वीजवाहिनीवर पाय पडल्याने विजेचा धक्का बसून गंभीर जखमी झालेल्या मुलीच्या वडिलांनी महावितरणच्या या निष्काळजीपणा विरोधात कळवा पोलिसात रविवारी तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून तपासात या प्रकरणी दोशी व्यक्तीचा शोध घेण्यात येणार असल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली.
कळव्यातील मनीषा नगरमध्ये राहणारी अक्षता संतोष देवरे ही अकरावीत शिकणारी मुलगी शनिवारी दुपारी आईला फोन करण्यासाठी जात होती. मोरया सोसायटीजवळच्या डी. एन. मयेकर दुकानाजवळील पदपथावर चालत असताना त्या भागात महावितरणचे भूमिगत विद्युत वाहिनीचे काम सुरू होते. मात्र त्याची कोणतीच माहिती या भागातील नागरिकांना महावितरणकडून देण्यात न आल्याने या भागातील रस्ता सुरूच होता, या वेळी एका प्लास्टिकची पिशवी बांधलेल्या विद्युत वाहिनीवर अक्षताचा पाय पडला आणि तिला विजेचा प्रचंड मोठा धक्का बसला. अक्षता हिला तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिचा उजवा पाय भाजला असून त्याची हालचालदेखील थांबली आहे.
या प्रकरणी अक्षता हिचे वडील संतोष देवरे यांनी महावितरणच्या निष्काळजीपणामुळेच हा प्रकार घडला असून या प्रकरणी कळवा पोलिसात महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधत गुन्हा दाखल केला आहे.

Story img Loader