मुंबईः साकी विहार रोडवरील निवासी संकुलात एका सुरक्षा रक्षकाने मराठी भाषेचा अपमान केल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केली. मारहाण झालेल्या सुरक्षा रक्षक भवानीप्रसाद झा (४०) यांच्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत
भाषेच्या मुद्द्यावरून हाणामारी
गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना बँकांमध्ये मराठीचा सक्तीने वापर व्हावा, यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले होते. त्यानंतर, मनसे कार्यकर्ते सातत्याने बँकांमध्ये जाऊन मराठीत व्यवहार करण्याची पाहणी करण्यास सांगितले होते. त्याचवेळी पवईतील एका सुरक्षा रक्षकाने मराठी भाषेबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते.
वाद कशामुळे सुरू झाला?
भवानीप्रसाद झा, मूळचे दरभंगा, बिहार येथील रहिवासी असून ते अंधेरी पूर्वेच्या मरोळ पाईपलाईन परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार, ते स्टेल्थ मॅनेजमेंट सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत गेल्या चार वर्षांपासून सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत आणि सध्या एल अँड टी एमराल्ड निवासी संकुलात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत.
३१ मार्च रोजी रात्री कामावर असताना, एका डिलिव्हरी बॉयशी त्यांची चर्चा झाली. अजिंक्य असे या डिलिव्हरी बॉयचे नाव असून, तो ऑर्डर डिलिव्हरीसाठी आला होता. झा यांनी त्याच्याशी हिंदीत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यामुळे अजिंक्य नाराज झाला. ऑर्डर पूर्ण केल्यानंतर अजिंक्यने झा यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली, शिवीगाळ केली आणि जबरदस्तीने त्यांना मराठीत बोलण्यास सांगितले.
वाद वाढत गेल्याने वैतागून झा यांनी मराठी भाषेबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. त्यामुळे अजिंक्य संतप्त झाला आणि तो काही वेळाने विजय निकम, संजय मुले आणि महेश गिरम या तीन सहकाऱ्यांसोबत परतला. या चौघांनी मिळून झा यांना मारहाण केली आणि जबरदस्तीने त्यांच्याकडून माफी मागायला लावली.
पोलिसांकडून तपास सुरू
या घटनेनंतर भवानीप्रसाद झा यांनी पवई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. अजिंक्य आणि त्याच्या तीन साथीदारांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. याप्रकरणी पवई पोलीस अधिक तपास करत आहेत. या संपूर्ण प्रकरणाचे चित्रीकरण समाज माध्यमांवर प्रसारित झाले. पोलिसांनी ते चित्रीकरण मिळवले असून त्याद्वारे पवई पोलीस तपास करत आहेत.