मुंबई : बेलार्ड इस्टेट येथील कंपनीची २९ कोटींची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली माता रमाबाई आंबेडकर (एमआरए) मार्ग पोलीस ठाण्यात शुक्रवारी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्ह शाखा करीत आहे.
हिंद ऑफ शोअर प्रा. लिमि.चे व्यवस्थापकीय संचालक मधुसुदन क्षीरसागर (७४) यांंच्या तक्रारीवरून एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात एका कंपनीच्या तीन संचालकांविरोधात भादंवि कलम ४२० (फसवणूक), ३४ (सामायिक कृत्य) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार कंपनी बार्ज, बोटी, बोटींवर खानपान सेवा आणि हाउसकीपिंग आदी सुविधा पुरवण्याचे काम करते. तक्रारीनुसार, २२ ऑक्टोबर, २०२२ ते २ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत तक्रारदार कंपनीने चार टग भाड्याने दिले होते.
तसेच खानपान सेवाही पुरविण्यात आली होती. केंद्र सरकारच्या एका कंपनीच्या कंत्राटानुसार ही सुविधा पुरवण्यात आली होती. त्याबाबत सरकारी कंपनीकडून आरोपी कंपनीला १६४ कोटी रुपये प्राप्त झाले. पण ती रक्कम तक्रारदार कंपनीला देण्यात आली नाही. त्यामुळे तक्रारदार कंपनीचे २९ कोटी ६९ लाख ४२ हजार ८७० रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करीत आहे.