मुंबई : टोरेस प्रकणात आरोपी असलेला युक्रेनियन अभिनेता आरमेन गरून अटाईन (४८) याच्याविरोधात मुंबई पोलिसांनी दुसरा गुन्हा दाखल केला. टोरेस प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखाने गेल्या महिन्यात त्याला अटक केली होती. टोरेस प्रकरणातील परदेशी आरोपींना मुंबईत प्रस्थापि करण्यात अटाईनने मदत केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
अटाईन विरोधात दाखल करण्यात आलेला नवीन गुन्हा हा बनावट जन्म प्रमाणपत्राशी संबंधित आहे. आरोपीने बनावट जन्म प्रमाणपत्र तयार करून त्याच्या आधारे भारतीय पारपत्र मिळवल्याचा प्रयत्न केल्याच आरोप आहे. आरोपीला टोरेस प्रकरणात २८ जानेवारीला वर्सोवा परिसरातून आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली होती. त्यावेळी त्याने स्वतःला भारतीय नागरिक असल्याचा दावा केला आणि त्याचे पालक भारतात राहतात असे सांगितले होते. पण तपासादरम्यान, पोलिसांना त्याच्याकडे भावाचेही जन्म प्रमाणपत्रही सापडले. पोलिसांनी हे प्रमाणपत्र तपासण्यासाठी महापालिकेच्या एफ- दक्षिण वॉर्डला पाठवले असता ते बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्याने हे बनावट प्रमाणपत्र वापरून पारपत्रासाठी ऑनलाइन अर्ज केला होता,असे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर भायखळा पोलिसांनी शुक्रवारी त्याच्यावर फसवणूक आणि कागदपत्रांची बनावटगिरी केल्याचा गुन्हा दाखल केला. अटाईन सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. १२ हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची १२५ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या परदेशी आरोपींना त्यांना मदत केल्याचा आरोप आहे. अटाईन व्यवसायाने अभिनेता असून त्याने काही हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला तो सहावा आरोपी आहे. तो गेल्या १० वर्षांपासून मुंबईत कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय राहत होता. त्याने काही हिंदी चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका केल्या होत्या. टोरेस प्रकरणातील मुख्य आरोपी मुंबईत आले त्यावेळी त्यांना मुंबई प्रस्थापित करण्यात अटाईनने मदत केल्याचा आरोप आहे. तसेच त्याने आरोपींना मदतही केली. अटाईनने सनदी लेखापाल अभिषेक गुप्ता आणि आरोपी सीईओ तौसिफ रियाज यांची युक्रेनियन सूत्रधारांशी ओळख करून दिली होती. यासाठी त्याला पैसे मिळाले होते. तो या प्रकरणातील मुख्य आरोपींनी आयोजित केलेल्या पहिल्या बैठकीलाही उपस्थित होता. तसेच, टॉरेसच्या दादर ऑफिसच्या उद्घाटनावेळीही तो हजर होता.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि मीरा-भाईंदर या भागांतील हजारो गुंतवणूकदारांचे याप्रकरणात कोट्यावधींचे नुकसान झाले आहे. हा संपूर्ण कट युक्रेन देशातील नागरिक असलेल्या मुख्य आरोपीने रचला होता. या प्रकरणात आरोपी असलेले युक्रेन देशाचे आठ नागरिक आणि एक तुर्कस्तान देशाचा नागरिक सध्या फरार आहेत. मुंबई पोलिसांनी त्यांच्या विरोधात इंटरपोल ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली आहे. टॉरेस प्रकरणातील मुख्य सूत्रधाराने गैरव्यवहारातील २०० कोटी रुपये परदेशात पाठवल्याचा संशय आहे. हा गैरव्यवहार उघड होण्यापूर्वी काही सतर्क नागरिक व गुंतणूकदारांनी पोलीस व इतर यंत्रणांना या प्रकरणाबाबतची ईमेलद्वारे माहिती दिली होती.