गेल्या दोन ते तीन वर्षांपासून शिक्षण संस्था चालविण्यावरून समर्थ समाज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव जोंधळे आणि संचालक मुलगा सागर जोंधळे यांच्यात वाद सुरू आहे. हा वाद आता नव्याने उफाळून आला आहे. शिवाजीराव यांच्या कार्यालयात काम करीत असलेल्या शीला यादव (५६) या कर्मचारी महिलेला सागर जोंधळे आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी जातिवाचक शिवीगाळ केल्याचा तसेच विनयभंगाचा गुन्हा विष्णुनगर पोलीस ठाण्यात रविवारी दाखल करण्यात आला.
याबाबत सागर जोंधळे यांनी सांगितले, ‘माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत. गेले १० दिवस मी डोंबिवलीत नाही. घटनेच्या दिवशी मी एका मंत्रीमहोदयांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो. शीला या शिवाजीराव व गीता खरे यांच्याकडे काम करतात. तक्रारदार महिला या माझ्या आई, आजीच्या वयाच्या आहेत. त्यामुळे विनयभंगाचा आरोप करताना त्यांनी विचार करणे आवश्यक होते.’
पोलिसांनी सांगितले, शीला या समर्थ समाज संस्थेच्या निवासामध्ये त्यांच्या कुटुंबीयांसह राहतात. शीला या शिवाजीराव जोंधळे यांच्या कार्यालयात काम करीत असल्याने सागर यांना त्याचा राग आहे. गेल्या आठ दिवसांपासून सागर गटाकडून शीला राहत असलेल्या घरात वरून पाणी सोडणे वगैरे प्रकार करून त्रास दिला जात आहे. शुक्रवारी रात्री सागर जोंधळे, लक्ष्मण पटारे आणि नरेंद्र चौधरी हे रात्री शिला यांच्या घरी आले. त्यांना जातिवाचक शिवीगाळ करून शीला यांचा विनयभंग केला. येत्या १० दिवसांत घर खाली केले नाहीतर ठार मारण्याची धमकी दिली.
या गडबडीत शीला यांचा मुलगा घरातून बाहेर येत असताना फिशटॅन्कवर पडून गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा