मुंबई : खासगी आणि आक्षेपार्ह चित्रफिती समाजमाध्यमांवरून प्रसारित केल्याच्या आरोपाप्रकरणी विभक्त पतीने दाखल केलेल्या गुन्ह्यात अभिनेत्री राखी सावंत हिला अटकेपासून दिलासा देण्यास दिंडोशी सत्र न्यायालयाने नकार दिला.
दिंडोशी न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीकांत भोसले यांनी राखी हिने अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळला. राखी हिने कथितरित्या प्रसारित किंवा प्रसिद्ध केलेल्या चित्रफिती अश्लीलच नाहीत, तर त्या आक्षेपार्हही आहेत. त्यामुळे, प्रकरणातील तथ्ये, आरोप आणि परिस्थितींचा विचार करता राखी हिला अटकपूर्व जामीन मंजूर करणे योग्य होणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने तिला दिलासा नाकारताना नमूद केले.
हेही वाचा >>>‘शस्त्रक्रिया यशस्वी झाली, पण रुग्ण दगावला’ अपिलीय प्राधिकरणाला उच्च न्यायालयाचा टोला
बदनामी करण्याच्या हेतूने राखी हिने आमच्या खासगी चित्रफिती समाजमाध्यमावरून प्रसिद्ध केल्या, असा दावा करून राखी हिचा विभक्त पती आदिल दुर्राणी याने तिच्याविरोधात अंबोली पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्या आधारे पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्याच्या संबंधित तरतुदींतर्गत राखी हिच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर, तिने अटकपूर्व जामिनासाठी दिंडोशी न्यायालयात धाव घेतली होती. आपल्याला खोट्या प्रकरणात गोवण्यात आले असून नाहक त्रास देण्याच्या हेतुने आपल्याविरोधात गुन्हा दाखल केल्याचा दावा राखी हिने अर्जात केला होता.