मुंबई : विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माध्यान्ह भोजन योजनेतंर्गत अन्नधान्य वितरणात झालेल्या कथित घोटाळ्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशी सुरू आहे, असे निरीक्षण नोंदवून उच्च न्यायालयाने संबंधित जनहित याचिका निकाली काढली.याचिकेतील आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत. परंतु, या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच, प्रकरणाची चौकशीही सुरू आहे. त्यामुळे, हे प्रकरण निकाली काढणे योग्य राहील, असे निरीक्षण मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने नोंदवले. तसेच, याचिका निकाली काढली.

तत्पूर्वी, भारतीय दंड संहितेच्या कलम ४०९ आणि ४२० अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच याबाबत चौकशीही सुरू आहे आणि लवकरच आरोपपत्र दाखल केले जाईल, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने न्यायालयाला देण्यात आली. त्यावर, गुन्हा आणि आरोपांची बारकाईने चौकशी करणे आणि जलदगतीने आरोपपत्र दाखल करणे आवश्यक असल्याचेही नमूद करून खंडपीठाने याचिका निकाली काढली.

काय प्रकरण ?

अन्नधान्य वितरणात घोटाळा झाल्याचा दावा भरत ठक्कर यांनी जनहित याचिकेद्वारे केला होता. पुरवठा केलेल्या धान्याचा पात्र शाळांमध्ये गैरवापर करण्यात आला. परिणामी, सरकारी तिजोरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा दावाही याचिकेत करण्यात आला होता. तसेच, या घोटाळ्यात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची, माध्यान्ह भोजन योजना योग्य पद्धतीने लागू करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती.