लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबईः वाहतूक पोलिसांचे टोइंग व्हॅन पूर्व मुक्त मार्ग येथून चोरीला गेल्याची घटना सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी शिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही वेळाने चोरीला गेलेले वाहन सापडले असून एका संशयीताची याप्रकरणी चौकशी करण्यात येत आहे.
वडाळा वाहतूक विभागात कार्यरत टाटा डिकॉर टोचन वाहन सोमवारी एका अनोळखी व्यक्तीने चोरले. याप्रकरणी पोलीस हवालदार अनिल शिरसाट यांच्या तक्रारीवरून शिवडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार रे रोड येथील पूर्व मुक्त मार्ग येथे हा प्रकार घडला. त्यानंतर सीसी टीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली असता ते बंद असल्याचे आढळून आले.
आणखी वाचा-मुंबई: शिवसैनिकांची गर्दी आणि जोरदार घोषणाबाजी
मिळालेल्या माहितीच्या आधारावर काही तासातच वाहन सापडले असून वाहन चोरल्याप्रकरणी एका संशयिताची चौकशी सुरू आहे. आरोपीची मानसिक स्थिती योग्य नाही. वाहनाच्या टायरबाबत काही काम असल्यामुळे वाहन मुक्त मार्ग परिसरात थांबवण्यात आले होते. पण आरोपी तेथून वाहन घेऊन गेला. याबाबत पुढील तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.