मुंबईः तीन वर्षांच्या लहान मुलीवर शाळेच्या शौचालयात लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार बांगूर नगर पोलिसांना प्राप्त झाली आहे. पीडित मुलीने दिलेल्या माहितीच्या आधारावर याप्रकरणी बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळेच्या शौचालयात प्रकार झाल्याचे तिने सांगितले आहे. पण शाळेत कोणीही पुरुष कर्मचारी नाहीत, मात्र पोलीस तेथील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण तपासणार असून शाळेतील कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवणार आहेत.
तक्रारीनुसार, ही घटना १२ फेब्रुवारी रोजी घडली. मुलीला शाळेत नेण्या-आणण्याचे काम तिची आई करते. शाळेतून घरी जाताना पीडित मुलीने आपल्याला त्रास होत असल्याचे आईला सांगितले. त्यानंतर आईने शाळेशी संपर्क साधून चौकशी केली. शाळा प्रशासनाने पीडित मुलीचे सीसीटीव्ही चित्रीकरण तिच्या कुटुंबियांना दाखवले. त्यात १२ मुलांना महिला मदतनीस शौचालयात नेताना आणि नंतर बाहेर आणताना दिसत आहेत. कोणताही पुरुष शौचालयात येताना किंवा जाताना दिसला नाही. यानंतर मुलीच्या आईने तिला डॉक्टरांकडे नेले. तिला संसर्ग झाला आहे किंवा तिच्यासोबत वाईट प्रकार झाला आहे, हे निश्चित सांगता येणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले. मुलीला कोणतीही दुखापत झालेली नाही. तिच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. शाळेतील कोणत्या महिला कर्मचाऱ्याने तिला त्रास दिला का? याबाबतही पीडित मुलीला विचारण्यात आले. परंतु तिने नकार देऊन “राक्षसाने” हा प्रकार केल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.