लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबईः देशातील संवेदनशिल तुरुंगांपैकी एक असलेल्या आर्थर रोड तुरुंगात एका कैद्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची गंभीर घटना घडली आहे. अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायदयांतर्गत गुन्हा दाखल असलेल्या दोन कैद्यांनी हा प्रकार केला आहे. याशिवाय आरोपींनी तक्रारदाराला मारहाण केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समीर शब्बीर शेख ऊर्फ पुडी (२३) व राशीद हसन फराज (३६) अशी आरोपींची नावे आहेत. दोघांनाही अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायदयांतर्गत अटक करण्यात आली होती. याप्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर दोन्ही आरोपींना न्यायबंदी म्हणून आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले होते. आरोपींनी स्नानगृहात एका २३ वर्षीय कैद्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपींनी बराकमध्ये या कैद्याला शिवीगाळ केली, तसेच त्यातील आरोपी पुडी याने त्याला मारहाणही केली. याप्रकरणी कैद्याने ना. म. जोशी मार्ग पोलिसांकडे तक्रार केली.

हेही वाचा… स्तन प्रत्यारोपणासाठी टाटा रुग्णालयात स्वतंत्र शस्त्रक्रियागृह; महिलांमध्ये जनजागृती करण्यावर भर

तक्रारीनुसार ७ जूनला हा प्रकार घडला आहे. तसेच ९ जूनला आरोपीने तक्रारदाराला मारहाण केल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी भादंवि कलम ३७७ (अनैसर्गिक अत्याचार), ५०४ (शांतता भंग करणे ), ५०६ (धमकावणे), ३२३ (मारहाण), ३४ (सामायिक इराद्याने केलेले कृत्य) केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे कायदेशीर कारवाई करून याप्रकरणी त्यांना अटक करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.

Story img Loader